

पुणे : मराठी प्रकाशनविश्वात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ प्रकाशक आणि मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक अनिल. डी. मेहता (वय ८३) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी (दि. ७) कोल्हापूरात निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, दोन नातू, नात असा परिवार आहे. त्यांनी प्रकाशन क्षेत्रात मोठे योगदान दिले.
अनिल मेहता यांचा जन्म ३ मार्च १९४१ रोजी झाला. मेहता यांचा पुस्तक व्यवसायातील प्रवास १९६४ मध्ये सुरू झाला. कोल्हापूर येथील मेहता बुक सेलर्सपासून सुरू झालेल्या या प्रवासाला १९७५ मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊसच्या उभारणीमुळे नवे वळण मिळाले. आपल्या दूरदृष्टीने, व्यावसायिक कौशल्याने आणि पुस्तकांवरील निष्ठेने त्यांनी या संस्थेची उभारणी केली. मेहता पब्लिशिंग हाऊसच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत सुमारे तीन हजारांहून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत.
दरवर्षी सुमारे १५० नवीन पुस्तके आणि ५० हून अधिक पुनर्मुद्रणे प्रकाशित करण्याची परंपरा त्यांनी निर्माण केली. अनेक नवोदित आणि तरुण लेखकांना त्यांनी प्रकाशनाची संधी दिली. मराठी साहित्याची क्षितिजे विस्तारण्याच्या दृष्टीने त्यांनी भारतीय आणि जागतिक साहित्य मराठीत आणण्यावर विशेष भर दिला. हिंदी, कन्नड, गुजराती, बंगाली यांसारख्या भारतीय भाषांबरोबरच जपानी, जर्मन, कोरियन, फ्रेंच अशा परकीय भाषांमधील साहित्याचे मराठी अनुवाद प्रकाशित केले.
अरुण शौरी, नानी पालखीवाला, किरण बेदी, सुधा मूर्ती, तस्लिमा नसरीन, जसवंत सिंह अशा विविध लेखकांचे साहित्य मराठी वाचकांपर्यंत पोहोचविण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. मराठी पुस्तकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळावे, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते. पॅरिस बुक फेअर, मॉरिशसमधील वर्ल्ड मराठी ऑर्गनायझेशन अशा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर त्यांनी सहभाग नोंदवला. लंडनमध्ये पुस्तक प्रकाशन आणि अमेरिकेत मराठी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यासारखे उपक्रमही त्यांनी राबवले.
जागतिक पुस्तक मेळ्यांमध्ये मराठी प्रकाशनविश्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मोजक्या प्रकाशकांमध्ये त्यांचा समावेश होता. मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष तसेच फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्सचे पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. पुस्तकनिर्मिती आणि प्रकाशन क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्सचा १९९६-९७ चा 'डिस्टिंग्विश्ड पब्लिशर' आणि 'व्ही. पी. भागवत पुरस्कार' मिळाला. त्यांच्या प्रकाशन संस्थेतील पुस्तकांना साहित्य अकादमी, राज्य सरकार आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांसारख्या संस्थांचे पुरस्कारही मिळाले. १९९१ मध्ये पुणे महानगरपालिकेने त्यांचा विशेष सन्मान केला. त्यांचा समावेश आयबीसीच्या 'हूज हू'मध्येही करण्यात आला होता.