कोंढवा: प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोंढवा बुद्रुकमधील शेतकरी कुटुंबातील अनिकेत वाघ या युवकाने अभिनय क्षेत्रातील कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ कष्ट व जिद्दीच्या बळावर अभिनय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. वेबसिरीज, एकांकिका, चित्रपट निर्मितीतून पैसा कमाविणे हे उद्दिष्ट न ठेवता केवळ सामाजिक बांधिलकी जपत अभिनयाच्या माध्यमातून समाजजागृती व समाजप्रबोधन करत आहे.
सध्या अॅानलाइन स्कॅम होत असून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला जात आहे. हाच विषय घेऊन कोंढव्यातील अनिकेत वाघ यांनी ‘फ्रॉम चायना विथ लव्ह’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून, सध्या सुरू असलेल्या एका लोन अॅप स्कॅमसाररख्या फसवणुकीच्या विषयावर आधारित हा चित्रपट आहे.
याबाबत अनिकेत वाघ म्हणाले, सायबर गुन्हे बर्याच प्रकारचे आहेत, त्यातलाच एक म्हणजे लोन अॅप स्कॅम हा तुलनेने जास्त घातक आहे. फसव्या लोन अॅप वरून कर्ज घेऊन बर्याच लोकांनी आपला जीव गमावला आहे. धमक्या देऊन कर्ज घेणार्याची प्रचंड छळवणूक करून त्याला मृत्यूशय्येपर्यंत या अॅपचे वसुली एजंट कसे घेऊन जातात, हा सर्व प्रवास या चित्रपटात दाखवला आहे.
या चित्रपटाचा लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक अनिकेत बजरंग वाघ असून यामध्ये अभिमन्यू शिवतरे नावाचे मध्यवर्ती पात्र स्वतः साकारत आहे. अभिमन्यू शिवतरे ग्रामीण भागातून येऊन पुण्यात मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचे काम करत असतो, पण जेव्हा तो या लोन अॅपच्या जाळ्यात अडकतो तेव्हा त्याचे आयुष्य कसे बदलून जाते, हा अत्यंत कटू पण वास्तविक प्रवास या चित्रपटात दाखवला आहे. हा चित्रपट येत्या 14 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. एका सामाजिक विषयावर आधारित चित्रपट निर्मिती वाघ यांनी केल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
आतापर्यंत त्यांना ‘आरसा’ या शॉर्ट फिल्मला महाराष्ट्र शासन आरटीओ व महाराष्ट्र राज्य संलग्न अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या रस्ते सुरक्षा अभियान 2021 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट लेखक आणि शॉर्ट फिल्मला द्वितीय पुरस्कार मिळाला आहे.
शॉर्ट फिल्म ‘ऊ ऊ ऊसाचा’ या ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणांच्या अडचणींवर भाष्य करणार्या शॉर्ट फिल्मला वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म महोत्सवात एकूण नऊ पुरस्कार मिळाले आहेत. एकाच यूट्यूब एपिसोडमध्ये 31 पात्र साकारून त्याचा विक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवला आहे.