अन् व्हिडीओवाला पोलिस निलंबित; चिरीमिरी घेताना कॅमेर्‍यात झाला होता कैद

अन् व्हिडीओवाला पोलिस निलंबित; चिरीमिरी घेताना कॅमेर्‍यात झाला होता कैद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लष्कर परिसरात फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या दुचाकीचालकाकडून चिरीमिरी घेताना कॅमेर्‍यात कैद झालेल्या वाहतूक पोलिसाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या पोलिस कर्मचार्‍याची पैसे घेतानाची क्लिप मागील दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. पोलिस हवालदार विजय मेवालाल कनोजिया असे निलंबित केलेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. त्यांची नेमणूक लष्कर वाहतूक विभागात होती.

कनोजिया हे 30 मार्च रोजी महावीर चौकात कर्तव्यावर होते. तेथे दुपारी दीडच्या सुमारास एक दुचाकी कोहिनूर हॉटेलच्या बाजूने महावीर चौकाकडे आली. दुचाकीवर एक पुरुष व एक महिला होते. त्यांच्या दुचाकीचा नंबर फॅन्सी असल्याने त्यांना कनोजिया यांनी दंडात्मक कारवाईची भीती दाखवली. यानंतर त्यांच्या दुचाकीवर दंडात्मक कारवाई न करता चिरीमिरी घेऊन सोडून दिले. त्याचा व्हिडीओ कुणीतरी बनवून 'मार्च एन्ड एम. जी. रोड' असा मेसेज तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला.

कनोजिया यांच्यावरील कारवाईच्या आदेशात म्हटले आहे की, वाहनावर कायदेशीर कारवाई न करता सोडून दिले. या संशयास्पद वर्तनाच्या वायरल सोशल मीडियाच्या क्लिपमुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्या अर्थी तुम्ही तुमचे कर्तव्य करीत असताना बेशिस्त, बेजबाबदारपणाचे व पोलिस खात्याला अशोभनीय असे गैरवर्तन करून अत्यंत गंभीर स्वरूपाची कसुरी केली आहे. तुम्हाला विभागीय चौकशीतील कार्यवाहीच्या अधीन राहून शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येत आहे. तुम्ही निलंबन कालावधीमध्ये दररोज राखीव पोलिस निरीक्षक, पोलिस मुख्यालय, पुणे शहर येथे हजेरी द्यावी, हा आदेश वाहतूक शाखेतील अति. कार्य. मुख्यालयातील पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी काढला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news