

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोपान धोंडीबा केंद्रे (वय 33, रा. विठ्ठलवाडी, लोणीकंद; मूळ रा. नांदेड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सोपानच्या 65 वर्षीय आईने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोपानची पत्नी आणि तिचा प्रियकर मधुकर अंबाजी केंद्रे (वय 35, रा. मु. पो. अंबुलगा, सेल्लाळी, ता. कंधार, जि. नांदेड) या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 6 एप्रिल रोजी विठ्ठलवाडी लोणीकंदमध्ये घडली.
दरम्यान, याबाबत पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर सोपान यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोपान केंद्रे हे ड्रायव्हर म्हणून काम करीत होते. तीन वर्षांपूर्वी ते पत्नी आणि मुलासह विठ्ठलवाडी लोणीकंदमध्ये वास्तव्यास आले होते. 2016 मध्ये सोपान यांचा विवाह झाला आहे. सोपान यांच्या पत्नीचा मित्र मधुकर केंद्रे हा देखील पुण्यात वास्तव्यास आहे. सोपानची पत्नी आणि मधुकर या दोघांत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते.
याबात सोपानने आईला माहिती दिली होती. सोपान पत्नीला मधुकर याच्यासोबत संबंध ठेवू नको, असे सांगत होता. मात्र, त्यातून दोघांत सतत वाद होत होते. सोपानची पत्नी त्याला तुझ्यासोबत राहणार नाही, तुला वाचू देणार नाही, अशी धमकी देत होती. तर मधुकरने देखील सोपान याला तू तुझ्या पत्नीला सोडून दे, मी तिला सांभाळतो, तू आमच्यामध्ये येऊ नको, नाय तर तुला सोडणार नाही, असे धमकावत होता. दरम्यान, 6 एप्रिल रोजी सोपानच्या बहिणीने त्याला फोन केला.
मात्र, त्याने तो उचलला नाही. त्यामुळे त्यांनी सोपानच्या पत्नीला फोन केला. त्या वेळी तिने सांगितले की, माझा आणि नवर्याचा वाद झाला आहे. त्यामुळे मी गावी आली आहे. काही वेळानंतर बहिणीने सोपान राहत असलेल्या घरमालकाला फोन करून विचारणा केली. त्यांनी दार वाजवून पाहिले. मात्र, कोणताच प्रतिसाद आला नाही. त्या वेळी सोपानने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. सोपान केंद्रे याने पत्नी आणि प्रियकर मधुकर केंद्रे या दोघांकडून होणार्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.