पुणेकरांचा विशेष पसंतीचा आंबेमोहोर तांदूळ हंगाम सुरू झाला असून, हंगामाच्या सुरुवातीलाच तांदूळ महागला आहे. मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश येथून शहरातील बाजारपेठेत दाखल होणार्या तांदळाच्या दरात यंदा 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यानुसार, भावात क्विंटलमागे 500 ते 1000 रुपयांनी वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या हंगामात सुरुवातीला 7 हजार ते 7 हजार 500 रुपये असणारे दर यंदा 8 हजार ते 9 हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत.
आंबेमोहोर तांदळाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये होते. सुगंधी आंबेमोहोर तांदळाचा राजा म्हणून ओळखला जातो. हा तांदूळ महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे बारा महिने वापरला जातो. महाराष्ट्रात येणार्या एकूण आंबेमोहोर तांदळापैकी 80 टक्के तांदूळ हा मध्य प्रदेशमधून, तर उर्वरित 20 टक्के तांदूळ आंध्र प्रदेश या राज्यांमधून येतो. यावर्षी या दोन्ही राज्यांमध्ये आंबेमोहोर तांदळाचे उत्पादन कमी झालेले आहे. परिणामी, बासमती तांदळाच्या दरांपर्यंत आंबेमोहोर तांदळाचे दर पोहोचतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसे झाल्यास हा एक विक्रम होईल. त्याचबरोबर आंबेमोहोर तांदळाचे दर हे यावर्षी कमी होण्याची शक्यता खूप कमी आहे, असा अंदाज ही व्यापार्यांकडून व्यक्त केला जात आहे
नॉन बासमती तांदळाची निर्यात बंदी उठवली
केंद्र सरकारने निर्यात कर कमी केल्याने परदेशातून मागणी जास्त
मध्य प्रदेश आणि आंध— प्रदेशात तांदळाच्या उत्पादनात घट
निर्यातदार व्यापार्यांकडून बांधावर मालाची खरेदी
शेतकर्यांचे उत्पादन घेण्याचे प्रमाण कमी
आंबेमोहोर तांदळाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये होते. हे वर्षातून एकदाच घेतले जाणारे पीक असल्यामुळे आणि पीक येण्यास जास्त वेळ लागत असल्यामुळे बर्याच शेतकर्यांनी त्याचे उत्पादन घेणे कमी केले आहे. दरम्यान, पुण्यात आंबेमोहोर तांदळाला खूप मोठी मागणी आहे. परंतु यावर्षी पुणेकरांना आंबेमोहोर तांदूळ 10 ते 15 रु. प्रतिकिलो महाग खरेदी करावा लागणार आहे. वर्षभर वापरल्या जाणार्या बासमती, आंबेमोहोर, इंद्रायणी व सुरती कोलम या तांदळापैकी आंबेमोहोरला चांगली मागणी आहे.
धवल शहा, व्यापारी, मार्केट यार्ड