

महाळुंगे पडवळ: आंबेगाव तालुक्याच्या उत्तर भागात शनिवारी (दि. 8) दिवसभरात सहावेळा वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या भागातील वीजपुरवठा सुरळीत करा; अन्यथा आंदोलन करू, असा इशारा किसान काँग्रेसचे आंबेगाव तालुकाध्यक्ष बाळासाहेब इंदोरे यांनी दिला आहे.
आंबेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील साकोरे, महाळुंगे पडवळ, नांदूर, कळंब, विठ्ठलवाडी, टाकेवाडी आदी गावांमधील वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. मागील आठवड्यात साकोरे येथील घरगुती वीज रात्रभर खंडित होती, तर दिवसभरात एक ते दोनवेळा वीज खंडित होण्याचे प्रकार घडत होते. शेतात रब्बी व उन्हाळी हंगामातील पिके जोमात आहेत. उन्हाची तीव्रता लक्षात घेता कांदा व पालेभाजीवर्गीय पिकांना पाण्याची नितांत गरज आहे.
हुतात्मा बाबू गेनू जलाशयाच्या डावा कालव्यातून पूर्णक्षमतेने पाण्याचे आवर्तन सुरू आहे. पण, वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकर्यांना रात्री-अपरात्री शेतातील पिकांना पाणी द्यावे लागत आहे. त्यातच बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रमाण लक्षात घेता शेतकरी जीव मुठीत धरून रात्री पिकांना पाणी देत आहेत.
आळेफाटा येथील मुख्य विद्युतवाहिनीत वारंवार बिघाड होत असल्याने हे प्रकार घडत आहेत. स्थानिक वीजपुरवठ्यामध्ये कोणताही अडथळा नाही. वरिष्ठ अधिकार्यांशी याबाबत बोलून वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत आग्रही राहू. शेतकर्यांनी सहकार्य करावे.
-निखिल तिवारी, शाखा अभियंता, महावितरण, कळंब
शेतातील वाफ्यात पाणी आले की वीज जाते. दिवसभरात कितीवेळा मोटर चालू करायला जायचे? असा प्रश्न पडतो. सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. पिकाला पाण्याची गरज आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करावा.
- सदाशिव गाडे, कांदा उत्पादक शेतकरी