

पारगाव : आंबेगाव तालुक्यात रब्बी हंगामातील कांदाकाढणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. मात्र, समाधानकारक दर मिळत नसल्याने यावर्षीही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी साठवणुकीचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील बहुतांश गावांमध्ये कांद्याच्या बराकी व चाळी पूर्णपणे भरल्याचे चित्र दिसून येत आहे.
यंदा कांद्याला अपेक्षित दर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरात वाढ होण्याच्या अपेक्षेने अनेक शेतकरी आपला कांदा तत्काळ विक्री न करता साठवून ठेवत आहेत. यासाठी पारंपरिक चाळींबरोबरच लोखंडी जाळीच्या आधुनिक बराकींचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.
तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे शेतात उघड्यावर ठेवलेला कांदा भिजून काही प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे उर्वरित कांद्याचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने साठवणुकीकडे वळण्याचा निर्णय घेतला. परिणामी, सध्या सर्वच ठिकाणी कांदा बराकी आणि चाळी फुल्ल झाल्या आहेत.
दरम्यान, योग्य बाजारभाव मिळेपर्यंत कांदा सुरक्षित राहावा, यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करीत आहेत. हवामानातील बदल लक्षात घेऊन कोरडे वातावरण आणि सुरक्षित साठवणुकीवर भर दिला जात आहे.