Pune News: खाकीचाच गुटख्यावर डल्ला? बॉक्स गायब करतानाचे व्हिडीओ व्‍हायरल

दरम्यान, या संपूर्ण घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावा केला असून, त्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
Pune News
Pune NewsPudhari
Published on
Updated on

पुणे: गुन्हेगारांवर कारवाई करून कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनीच जप्त केलेल्या मुद्देमालाची अफरातफर केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे ग्रामीणमधील राजगड पोलिस ठाण्याशी संबंधित हा धक्कादायक प्रकार आहे.

गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करून तो जप्त केल्यानंतर त्याच ट्रकमधून काही गुटख्याचे बॉक्स रात्रीच्या वेळी काढून नेण्यात आल्याचा पोलिसांवर आरोप होत आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावा केला असून, त्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Pune News
Pune Kharif Sowing Update: जिल्ह्यात खरीप पिकांच्या ७५ टक्‍के पेरण्या पूर्ण

मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षी २२ सप्टेंबर २०२५ रोजी राजगड पोलिसांनी गुटख्याने भरलेला ट्रक पकडून त्यावरील मुद्देमालासह वाहन जप्त केले होते. कायदेशीर प्रक्रियेनुसार हा ट्रक पोलिस ठाण्याच्या आवारात उभा केला होता.

मात्र, त्याच दिवशी रात्री सुमारे दहा वाजेच्या सुमारास काही पोलिस कर्मचारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या खासगी व्यक्तींनी ट्रकमधून पाच ते सहा गुटख्याचे बॉक्स बाहेर काढून कारमध्ये टाकले. याबाबतचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्‍यामुळे चोरावर-मोर होण्याचा हा प्रकार आता चांगलाच अंगलट आल्‍यसाचे बोलले जात आहे.

Pune News
Mangesh Jagtap Fraud Case: लग्नाचे आश्वासन, लाखोंची फसवणूक आणि आता जि. प. सदस्य फरार; बारामतीतील प्रकरणाने खळबळ

खरंतर महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू आहे. कारवाई केल्यानंतर जप्त केलेल्या अवैध मुद्देमालाची जबाबदारी पोलिसांवर असते. मात्र, त्याच मुद्देमालावरच डल्ला मारल्याचा आरोप झाल्याने राजगड पोलिस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हा प्रकार केवळ शिस्तभंगाचा नसून पोलिसांच्या विश्वासार्हतेलाच तडा देणारा असल्याची चर्चा सुरू आहे. या वेळी नेमके कोणाच्‍या सांगण्यावरून जप्‍त मालाची अफरातफर करण्यात आली, याचा तपास होणार का? असा प्रश्न आता उपस्‍थित होऊ लागला आहे.

पोलिस ठाण्यात नेमके काय सुरू

राजगड पोलिस ठाण्याचे नाव यापूर्वीही वादात आले होते. एक कोटी रुपयांच्या दरोड्याच्या कट प्रकरणात काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या कथित सहभागाची चर्चा ताजी असतानाच आता जप्त केलेल्या गुटख्याच्या बॉक्सची कथित चोरी समोर आल्याने या पोलिस ठाण्यात नेमके सुरू काय आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

मी या प्रकारणात तत्‍कालीन पोलिस निरीक्षक इतर अधिकारी व कर्मचारी यांच्‍या विरोधात सहा महिन्यापूर्वी मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक, ग्रामीण पोलिस अधीक्षक यांना निवेदन दिले होते. दहा दिवसांपूर्वी विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्‍हापूर या प्रकरणाबाबत ईमेल देखील केला होता. त्‍यावर त्‍यांच्‍या कार्यलयाकडून पोलिस अधीक्षकांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले असल्‍याचे मला कळवले होते. सहा महिन्यांपूर्वी पुणे ग्रामीण उपविभागीय अधिकारी गौर यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. अद्याप या प्रकरणात कारवाई झाली नाही.

- संतोष मोहिते, अध्यक्ष, शिव प्रहार प्रतिष्ठान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news