

पुणे: सिंहगड किल्ल्याव्यतिरिक्त जिल्ह्यातील सर्व गड- किल्ले अतिक्रमणमुक्त असल्याचे सकारात्मक चित्र पुढे आले आहे. सिंहगड किल्ल्यावरील अतिक्रमणेही किरकोळ स्वरूपाची असल्याचे निदर्शनास आले असून, येत्या काही दिवसांत तीही काढून टाकण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला आहे.
राज्याला शिवरायांच्या गड-किल्ल्यांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. ती राज्याच्या संस्कृती आणि शौर्याची प्रतीके आहेत. छत्रपती श्रीशिवाजी महाराजांनी याच किल्ल्यांवर स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि मराठा साम्राज्याची स्थापना करून याच गड-किल्ल्यांच्या मदतीने साम्राज्य विस्तार केला. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये किल्ल्यांवर पर्यटकांची वाढती गर्दी आणि व्यावसायिक उपक्रम यामुळे त्यांना अतिक्रमणांचा विळखा पडू लागला.
टपर्या, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि इतर बांधकामांनी किल्ल्यांचे मूळ स्वरूप आणि सौंदर्य बाधित झाले आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिक आणि प्रशासन यांनी एकत्र येत किल्ल्यांना अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम हाती घेतली.
राज्यातील गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी आणि भविष्यात ती होऊ नये, यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत, राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे.
या समितीत ग्रामीण पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वन विभाग आणि पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांचा समावेश आहे. ही समिती जिल्ह्यातील किल्ल्यांची पाहणी करून अतिक्रमणांचा आढावा घेत आहे आणि त्यावर कार्यवाही करत आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष घातले असून, हा ऐतिहासिक वारसा जतन करायचे ठरविले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील किल्ल्यांची माहिती पुरातत्व विभागाकडून मागवली होती.
पुरातत्व विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात एकूण 24 गडकिल्ले आहेत. यापैकी पाच किल्ले ‘संरक्षित’ (राज्य संरक्षित स्मारक) असून 19 किल्ले ‘असंरक्षित’ श्रेणीत येतात. संरक्षित किल्ले म्हणजे ज्यांचे ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्त्व लक्षात घेऊन त्यांचे जतन करण्याची जबाबदारी सरकारची असते.
जिल्हाधिकारी डुडी यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणांचा तपशीलवार अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. या अहवालानंतर हवेली तालुक्यातील सिंहगड वगळता इतर कोणत्याही किल्ल्यावर सध्या अतिक्रमण नसल्याचे स्पष्ट झाले. सिंहगडावर असलेले अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हा प्रशासन आता विशेष मोहीम राबवणार आहे आणि पुढील महिन्याच्या अखेरीस हा किल्ला पूर्णपणे अतिक्रमणमुक्त केला जाईल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
सिंहगड किल्ल्यावर आढळली चार अतिक्रमणे
सिंहगड किल्ल्याला ऐतिहासिक आणि नैसर्गिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. हा किल्ला पुणे शहराच्या अगदी जवळ असल्याने येथे नेहमीच पर्यटकांची मोठी गर्दी असते. याच कारणामुळे या किल्ल्यावर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. त्यात चार दगड, विटा आणि पत्र्याचे बांधकाम असल्याचे समोर आले आहे. तर 31 स्टॉलला वन विभागाच्या वतीने परवानगी देण्यात आली आहे. ही माहिती राज्य सरकारला पाठविण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.