

आळंदी : गेल्या काही दिवसांपासून मावळ आणि धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून त्यामुळे इंद्रायणी नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे.
नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे आळंदीतील दगडी पूल तसेच धरणाजवळील नवीन पूल खबरदारीचा उपाय म्हणून हे पूल तात्काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
नगरपरिषद व पोलिस प्रशासनाने संयुक्तरीत्या कार्यवाही करत पूल परिसर सील केला असून नागरिक व भक्तांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक बंद केली आहे. पुंडलिक मंदिर, भक्ती सोपान पुल पाण्याखाली गेला आहे. पुल बंद असल्याने सोबतच पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठी अनावश्यक गर्दी टाळावी, तसेच उत्सुकतेपोटी पाण्याच्या प्रवाहाजवळ जाण्याचे टाळावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
याबाबत मुख्याधिकारी माधव खांडेकर म्हणाले, इंद्रायणी नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे. प्रशासनाकडून पूरस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. धोका निर्माण झाल्यास तातडीने आवश्यक ती उपाययोजना केली जाईल.
दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने नदीकाठच्या वस्ती भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस, तसेच आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.