

Akhil Bharatiya Sahitya Sammelan
पुणे : आगामी साहित्य संमेलन कुठे? होणार याविषयीची चर्चा साहित्य वर्तुळात सुरु झाली असून, 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची 8 जून रोजी निश्चिती होणार आहे. स्थळ निवड समितीच्या भेटीनंतर होणार्या अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या बैठकीत संमेलन स्थळाची घोषणा केली जाणार आहे. साहित्य संमेलनासाठी औदुंबर, इचलकरंजी, कोल्हापूर आणि सातारा येथील संस्थांकडून निमंत्रणे आली आहेत. यातील कोणत्या स्थळाची निश्चिती होते, याबाबतची उत्सुकता लेखक - साहित्यिकांमध्ये निर्माण झाली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय तीन वर्षांसाठी पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आले आहे. त्यामुळे आता आगामी साहित्य संमेलनाच्या नियोजनालाही सुरुवात झाली आहे. 99 व्या साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी स्थळ निवड समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती पाच, सहा आणि सात जून रोजी निमंत्रक संस्थांना भेट देणार आहे. 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सदानंद साहित्य मंडळ (औदुंबर), महाराष्ट्र साहित्य परिषद (शाखा इचलकरंजी), दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा (कोल्हापूर) आणि महाराष्ट्र साहित्य परिषद (शाखा शाहूपुरी, सातारा) या संस्थांकडून निमंत्रणे आली आहेत.
या स्थळांना भेटी दिल्यानंतर स्थळ निवड समितीची बैठक 8 जून रोजी सकाळी पुणे येथे होणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी सकाळी अकरा वाजता साहित्य महामंडळाची बैठक होणार असून, त्यात 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले. स्थळ निवड समितीत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, मराठवाडा साहित्य परिषदेचे रामचंद्र काळुंखे, मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रतिभा सराफ यांचा समावेश आहे.