Ajit Pawar: अजित पवारांच्या निर्णयाने अनेक प्रश्नांच्या चर्चांना उधाण; 'माळेगाव'च्या सत्ताधाऱ्यांसह विरोधकही अचंबित

अजित पवार यांनीच रिंगणात उडी घेतल्याने ही निवडणूक आता वेगळ्याच टप्प्यावर येऊन पोहचली आहे
Ajit Pawar: अजित पवारांच्या निर्णयाने अनेक प्रश्नांच्या चर्चांना उधाण; 'माळेगाव'च्या सत्ताधाऱ्यांसह विरोधकही अचंबित
Published on
Updated on

पुणे/शिवनगर : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'ब' वर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने दिग्गज नेत्यांसह सभासदांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

जाणकारांच्या मते अजित पवारांच्या उमेदवारीमुळे राज्यातील महायुती सरकारमुळे 'माळेगाव'च्या कार्यक्षेत्रातील भाजपच्या बलाढ्य मंडळींना मदत करण्यात वरिष्ठांना अडचणी येतील, अशी अटकळ यामागे आहे. तसेच, पक्षांतर्गत चळवळ्यांवर दबाव टाकण्याचाही हा प्रयत्न आहे. काहीही कयास असले, तरी अजित पवारांची ही गुगली भल्याभल्यांची बत्तीगुल करणारी ठरणार असल्याचे दिसते. राज्यासह जिल्ह्यातील तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील अनेकांच्या भुवया यामुळे उंचावल्या असून, तर्कवितर्क व चर्चांना उधाण आले आहे.

Ajit Pawar: अजित पवारांच्या निर्णयाने अनेक प्रश्नांच्या चर्चांना उधाण; 'माळेगाव'च्या सत्ताधाऱ्यांसह विरोधकही अचंबित
Ajit Pawar: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांची एंट्री, भाजपच्या धसक्याने निर्णय घेतल्याची चर्चा

अजित पवार यांनीच रिंगणात उडी घेतल्याने ही निवडणूक आता वेगळ्याच टप्प्यावर येऊन पोहचली आहे. 'माळेगाव'ची निवडणूक खुद्द पवार यांनी लढवावी इतपत कारखान्याची स्थिती खालावली आहे का? अशी चर्चा सभासद उपस्थित करू लागले आहेत.

'माळेगाव'च्या रणांगणात पवारांना दोनवेळा जोरदार धक्का चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या गुरू-शिष्यांच्या जोडीने यापूर्वी दिला आहे. सध्या ते भाजपमध्ये असून, भाजपकडून त्यांना निवडणुकीसाठी मोठी रसद मिळू शकते. याच विरोधकांनी पवार यांचे सगळे मनसुबे उधळून लावण्याची रणनीती आखत तोडीस तोड पॅनेल उभे करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 'माळेगाव'चे सभासद 'कात्रजचा घाट' दाखवू शकतात, या शक्यतेनेच पवार यांनी अर्ज दाखल केल्याचे बोलले जात आहे.

स्वतःचाच उमेदवारी अर्ज दाखल करून विरोधकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचाही पवार यांचा प्रयत्न असू शकतो किंवा मी स्वतःच संचालक मंडळात असेन, त्यामुळे पुढील पाच वर्षांत सर्व काही आलबेल असेल, असा संदेश सभासदांपर्यंत पोहचविण्याचाही त्यांचा प्रयत्न असू शकेल, असे सांगितले जात आहे. तसेच, विरोधकांना पुरते नामोहरम करण्याचा चंग अजित पवार यांनी बांधल्याचे दिसते.

Ajit Pawar: अजित पवारांच्या निर्णयाने अनेक प्रश्नांच्या चर्चांना उधाण; 'माळेगाव'च्या सत्ताधाऱ्यांसह विरोधकही अचंबित
माळेगाव: पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचविले

नुकत्याच झालेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांनी अडचणीतील कारखाना बाहेर काढण्यासाठी कट्टर विरोधक असलेल्या पृथ्वीराज जाचक यांना बरोबर घेत त्यांना कारखान्याचे अध्यक्षपद देऊन कारखान्याची स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी चंग बांधला आहे. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने घेतलेल्या शेतकरी मेळाव्यात देखील अजित पवार यांनी ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या ऊसदरावर कोणताही परिणाम न होता अनेक चांगल्या गोष्टी सभासदांसाठी करण्याचा संकल्प बोलून दाखविला होता. मावळत्या संचालक मंडळाच्या काही चुका झाल्याची कबुलीही त्यांनी दिली होती. इथून पुढे अशा प्रकारच्या चुका होणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी त्याच मेळाव्यात दिली होती. या चुका टाळण्यासाठी स्व:तच संचालक मंडळात येण्याची तयारी अजित पवार यांनी केल्याचे दिसते.

अजितदादांचे धक्कातंत्र...

लोकशाहीत निवडणुका म्हणजे एक युद्धच असते. निवडणूक शास्त्राचा अभ्यास करीत अजित पवार यांनी धक्कातंत्र वापरत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना अचंबित केले आहे. विरोधक या धक्कातंत्राचा कशाप्रकारे सामना करतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

स्वत:चाच निर्णय बदलला...

वास्तविक, राज्य शासनात काम करीत असताना वाढलेल्या व्यापामुळेच पवार यांनी यापूर्वी सहकारी संस्थांवर स्वतः संचालक न राहता इतरांना संधी दिली होती. पुणे जिल्हा बॅंकेसह साखर कारखान्यांवर पवार हे बॅंक प्रतिनिधी म्हणून संचालक मंडळात होते. परंतु, त्यानंतर त्यांनी ही पदे सोडून देत पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांना संधी दिली आहे. ही स्थिती असताना 'माळेगाव'च्या रणांगणात त्यांनी घेतलेली उडी आश्चर्यकारक मानली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news