

बारामती: बोरकरवाडी (ता. बारामती) येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक काकांच्या नावाचा उल्लेख केला. काकांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे चालत नाही, असं वक्तव्य केलं आणि पुन्हा एकदा अजित पवारांच्या या वक्तव्याची बारामतीत चर्चा झाली.
शनिवारीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते तसेच रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा. शरद पवार हे एकाच व्यासपीठावर शेजारी-शेजारी बसलेले पाहायला मिळाले. ही घटना ताजी असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काकांना विश्वासात घ्याव लागतं, असं वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या सी. एस. आर. निधीतून जानाई योजनेतून बंद जलवाहिनीद्वारे बोरकरवाडीच्या तलावात पाणी सोडण्यात आले. त्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (दि. 13) बोरकरवाडी येथे केले. यानिमित्ताने आयोजित जलपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनेक कार्यकर्त्यांनी निवेदने दिली होती. या निवेदनाचा उल्लेख करतानाच त्यांच्यासमोर बसलेल्या ’काका’ कुतवळ त्यांच्याकडे पाहत त्यांनी एका रस्त्याच्या कामकाजाबद्दल तुमच्याशी बोललो आहे, अधिकार्यांशी बोललो आहे, त्यांना मी सांगितले आहे की, काकांना विश्वासात घ्या...एवढं बोलून अजित पवार काही क्षण थांबले आणि पुन्हा म्हणाले... अहो ‘काकांना’ विश्वासात घेतल्याशिवाय पुढे काही चालत नाही बाबा..! आणि त्यांच्या या विधानावर उपस्थितांनी हसून दाद दिली.
पुढे काय चर्चा होईल, हे लक्षात घेत अजित पवारांनी, मी काका कुतवळबद्दल बोलतोय, नाहीतर लगेचच तुम्ही दादा घसरले असे म्हणाल, पण दादा घसरलेले नाहीत, असे म्हणताच पवार यांच्या वक्तव्यावर सर्वांनी हसून दाद दिली.
शेजारी- शेजारी बसले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या साखरपुड्याला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हजेरी लावली होती. याशिवाय सातार्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमातही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार एकत्र शेजारी-शेजारी बसले होते. या अगोदरही काकांच्या आशीर्वादाने आमचं बरं चाललं आहे, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. पवार यांच्या वारंवार होणार्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे.