भवानीनगर: माळेगाव, सोमेश्वरच्या तुलनेत श्रीछत्रपती सहकारी साखर कारखान्यास ऊस दरामध्ये 700 ते 800 रुपयांचा फटका बसला आहे. कामगार भरतीत कारखान्याचे वाटोळे झाले आहे. संचालक झाला तर योग्य भरती केली पाहिजे. छत्रपती शिक्षण संस्थेत काहीच नियमाने नाही. बिंदू नियमावली पाळली नाही. जवळचा आहे, घे चिकटवून आणि काही वर्षे झाले की म्हणतात, करा कायम, अशी परिस्थिती झाली आहे. हे बदलावं लागेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्याच्या कारभाराचे सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये वाभाडे काढले. कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भवानीनगर येथे हा मेळावा घेण्यात आला होता.
पवार म्हणाले, छत्रपती कारखान्याची 10 वर्षांनी निवडणूक होत आहे. अत्यंत गरीब परिस्थिती असताना सोनं-नाणं मोडून शेतकर्यांनी शेअर विकत घेतले व तत्कालीन संचालक मंडळाने कारखाना उभा केला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहे. छत्रपती कारखान्याच्या निवडणुका नेहमीच चुरशीच्या झाल्या आहेत, परंतु आताचा काळ वेगळा आहे. सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आहे.
काही साखर कारखाने चांगले चालले असले, तरी अनेक साखर कारखाने अडचणीत आलेले आहेत. साहेबराव जाचक अण्णासाहेब घोलप यांच्या कामाची पद्धत वेगळी होती, हे सांगण्याची गरज नाही. त्यांच्यापासून आप्पासाहेब पवार, पृथ्वीराज जाचक, दत्तात्रय भरणे, प्रशांत काटे व आतापर्यंत झालेल्या सर्वच अध्यक्षांनी चांगल्या पद्धतीने काम केले आहे.
पुढील पाच वर्षे पृथ्वीराज जाचक यांच्याकडे कारखान्याचे नेतृत्व देण्याचे ठरवले आहे. काही लोकांकडे कारखाने आहेत परंतु ते आमदारकीला व खासदारकीला निवडून येत नाहीत, असा टोला हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता अजित पवार यांनी लावला.
क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, छत्रपती कारखान्याची निवडणूक ही इतर निवडणुकांप्रमाणे नाही. ही प्रपंचाशी निगडित असणारी निवडणूक आहे, यामध्ये राजकारण आणू नये. सभासदांच्या उसाला भाव व कामगारांना चांगला बोनस मिळाला पाहिजे.
राजकीय हेवेदावे विसरून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. उमेदवारी कोणाला मिळते यापेक्षा नेत्यांचा आदेश सर्वांनी मान्य केला पाहिजे व छत्रपती कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.
साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक म्हणाले, निर्दोष मतदार यादी हा सहकार चळवळीचा आत्मा आहे. सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः या मेळाव्याला येण्याची तयारी दाखवली. मागे जे काही झालं ते सोडून देऊन छत्रपती कारखान्याला अडचणीतून बाहेर काढायचा आहे.
कारखान्याला अडचणीतून बाहेर काढल्याशिवाय शेवटचा श्वास घेणार नाही, त्यासाठी दोन पावले मागे-पुढे घ्यावी लागतात. सर्व घटकांना बरोबर घेऊन जायचे आहे. कारखान्याच्या सभासदांनी यापुढे बाहेर ऊस देऊ नये. छत्रपती कारखान्याला लवकरच पूर्वीचे वैभव प्राप्त होईल. ही सभा ऐतिहासिक आहे. छत्रपतीतून मी बाजूला गेलो, परंतु छत्रपती माझ्यातून गेला नाही. अजित पवार व दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली कारखाना नावारूपाला आणायचा असल्याचे जाचक म्हणाले.
ट्रॅक्टर सोड, डायरेक्टर आहे
ज्यांचा ऊस वाहतुकीला ट्रॅक्टर आहे आणि चालकाने सांगितले की आपला नंबर लवकर येत नाही की बाबा पांघरून घेऊनच मोटरसायकलवर येतोय व वॉचमनला म्हणतोय डायरेक्टर आहे. ट्रॅक्टर सोड आणि ट्रॅक्टर खाली होतो ही कुठली पद्धत आहे. ही पद्धत छत्रपती कारखान्यावर कधीही नव्हती, आर्थिक शिस्त होती. त्या वेळच्या लोकांनी चटणी भाकरी खाऊन कारखाना उभा केला त्या लोकांना काय वाटत असेल ? असेही अजित पवार यांनी सुनावले.
बाकीच्यांनी काय बोंबलत बसायचं?
काय काय बहाद्दरांनी टॉवर उभा करताना माझ्या शेतात टॉवर येतोय, मी उभा करून देतो पण मी रिटायर झाल्यावर माझ्या मुलाला कारखान्यात घ्या, असला करार केला आहे. बाकीच्यांनी काय चुना लावून बोंबलत बसायचं ? या शब्दात अजित पवार यांनी हजेरी घेतली.
छत्रपती बाजाराचे संचालकच बदाम खिशात घालायचे
छत्रपती बाजार उघडला होता. मी चेअरमन होतो, तोपर्यंत बरा चालला. मी राज्यमंत्री झाल्यानंतर राजीनामा दिला. नंतर त्याची वाट लागली, बंदच पडला तो. नंतर जे प्रमुख नेमले तेच तिथे जाऊन वेलदोडा घे खिशात घाल, बदामाचे पाकीट घे खिशात घाल असं करायचे. सेल्समन म्हणतोय, आव खिशात चाललंय, असे अजित पवार म्हणाले.