Pune Ajit Pawar News
पुणे: एक रुपयात पीकविमा दिला जात होता. मात्र, अनेक शेतकर्यांनी या योजनेत चुना लावल्याने ही योजना अडचणीत आली आहे. आम्ही ते सगळं काढलं आहे. आता तुमच्या भल्याचं करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे आता याबाबत नव्याने विचार केला जात असून, मुख्यमंत्री तसेच कृषिमंत्री यांची एकत्रित बैठक झाली आहे. तीत शेतकर्यांना चांगला कार्यक्रम देणार आहोत, अशी माहिती पवारांनी या वेळी दिली.
जिल्हा प्रशासन तसेच कृषी विभागाच्या वतीने ‘दिशा कृषी उन्नतीची’ या जिल्ह्यातील शेतीच्या पाच वर्षांच्या आराखड्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, ‘जिल्ह्याचा पाच वर्षांचा आराखडा आखण्यात येत आहे. यासाठी निधीची उपलब्धतादेखील करून दिली जाईल. मात्र, हा निधी त्याच कामासाठी वापरावा ही किमान अपेक्षा आहे.
मी माझं जीवन संपवतोय, मुलाबाळांना सोडून आत्महत्या करतोय, ही भावना शेतकऱ्यांच्या मनात येता कामा नये, यापद्धतीने पुढे जायचं आहे. त्याचे देखील नियोजन आम्ही केले आहे आणि कामाला लागलो आहे. मी आज अर्थमंत्री म्हणून सात लाख वीस कोटींचा अर्थसंकल्प सादर केलाय. चांद्यापासून बांद्यापर्यंत माझ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, त्याच्या पाठीशी उभे राहू. तुम्ही तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका, असंही आवाहन अजित पवारांनी केलं.
मी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात शेतकर्यांच्या भेटी घेत आहे. त्यांच्याकडून येणार्या सूचना लक्षात घेता शेतीसाठी नवीन धोरण तयार करण्याच्या विचारात आहे. कृषी विभागाच्या यापूर्वीच्या सचिव व आयुक्तांनी काहीही काम केले नाही. त्यांचे कृषी विभागाकडे लक्ष नव्हते.
- माणिकराव कोकाटे, कृषिमंत्री
जिल्ह्यातील शेतीमध्ये बदल घडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी निर्देश दिले होते. त्यानंतर सुमारे 50 बैठकांमधून पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मुख्य पिकांची उत्पादकता वाढली पाहिजे, असा त्यात प्रयत्न केला आहे.
- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी