

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची बातमी कळताच माध्यमांची पावलं दिल्लीतील ६, जनपथकडे (शरद पवारांचे दिल्लीतील निवासस्थान) रवाना झाली. सुप्रिया सुळे यांच्यासह अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार आणि त्यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार हे ६, जनपथ येथे होते. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार बुधवारपासून सुरू झालेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. अजित पवार यांच्या निधनाची बातमी मिळताच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार एकत्र विमानतळाकडे रवाना झाले. त्यानंतर विशेष विमानाने पुण्याकडे रवाना झाले. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) राष्ट्रीय कार्याध्यक्ष, खासदार प्रफुल्ल पटेल आणि इतर खासदारही विशेष विमानाने पुण्याकडे रवाना झाले.
बारामतीतील विमान अपघाताची माहिती कळताच खासदार फौजिया खान, निलेश लंके, भाजप खासदार निशिकांत दुबे ६, जनपथवर दाखल झाले. या खासदारांसह ६, जनपथवर आलेले सर्व लोक शोकमग्न होते. निलेश लंके तर ओक्साबोक्शी रडत होते.
अजित पवार यांच्या निधनाची बातमी मिळताच, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियांका गांधी यांनी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्याशी फोनवरून संवाद साधला. काँग्रेस आणि भाजपसह विविध पक्षांच्या नेत्यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधला आणि शोक व्यक्त केला. अपघाताची माहिती घेण्यासाठी इतर राज्यातील खासदार संसद भवन संकुलात महाराष्ट्राच्या नेत्यांना आणि केंद्रीय मंत्र्यांना भेटताना दिसले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसद भवन संकुलात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली.
अजित पवार यांच्या विमान अपघाताची पारदर्शक आणि जबाबदारीने तपास करू: केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री
विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी शोक व्यक्त केला. विमान अपघाताचा पारदर्शक आणि जबाबदारीने सखोल तपास केला जाईल, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी बुधवारी दिली. ते म्हणाले की, प्राथमिक माहितीनुसार, सकाळी ८:४८ च्या सुमारास लँडिंगच्या वेळी घटनास्थळी दृश्यमानता कमी होती. लँडिंगपूर्वी, एटीसीने वैमानिकाला धावपट्टी दिसत आहे का असे विचारले, आणि त्याने ती दिसत नसल्याचे सांगितले.
केंद्रीयमंत्री म्हणाले की, 'गो-अराउंड' केल्यानंतर विमान पुन्हा उतरण्यासाठी परत आले, आणि वैमानिकाला पुन्हा विचारण्यात आले की लँडिंगसाठी धावपट्टी दिसत आहे का. त्यानंतर, वैमानिकाने धावपट्टी दिसत असल्याची पुष्टी केली. एटीसीने लँडिंगला परवानगी दिल्यानंतर, अपघात झाल्याचे दिसून आले, असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, माझे मन दुःखाने खूप जड झाले आहे. अजित दादा आता आपल्यात नाहीत हे पचवणे कठीण आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या इतर चार व्यक्तींच्या कुटुंबियांप्रति मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. अजित दादा सार्वजनिक सेवेतील त्यांच्या अनुभवामुळे आम्हाला खूप मार्गदर्शन करायचे. महाराष्ट्रासाठी ही एक कधीही भरून न येणारी हानी आहे. त्यांच्यासारखे नेते मिळणे खूप कठीण आहे, असे ते म्हणाले.