डीजीसीएचा निर्णय
प्रवाशांसाठी दिलासा, राष्ट्रीय सुरक्षेलाही प्राधान्य
विमानाच्या खिडकीवर आता आच्छादनाची गरज नाही
पुणे : भारतीय हवाई दलाच्या विमानतळांवरून होणार्या नागरी उड्डाणांमध्ये खिडकीच्या शेड्स (आच्छादन) लावण्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) घेतला आहे. हा निर्णय प्रवाशांच्या सोयीसाठी एक स्वागतार्ह पाऊल मानले जात असले तरी राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य असल्यामुळे भारतीय हवाई दल आणि नागरी विमानोड्डाणांचे संयुक्त ऑपरेशन्स असलेल्या विमानतळांवर विमान उड्डाण होत असताना परिसराचे मोबाईलद्वारे चित्रीकरण करण्यास बंदी कायम असणार आहे. (Latest Pune News)
युद्धजन्य स्थितीच्या काळात भारतीय हवाई दल आणि नागरी उड्डाणे यांच्या संयुक्त वापरासाठी असलेल्या विमानतळांवरून उड्डाण करताना प्रवाशांना खिडकीच्या शेड्स बंद ठेवणे बंधनकारक होते. मात्र, आता डीजीसीएने ही अट रद्द केली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना प्रवासात अधिक आराम मिळणार आहे. त्याचबरोबर, अशा विमानतळांवर छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफीवर असलेली बंदी कायम ठेवण्याचा निर्णय देखील डीजीसीएने घेतला आहे.
वायुदलाच्या विमानतळावरील लष्करी उपकरणे, लष्करी विमाने, तैनात शस्त्रास्त्र प्रणाली, इंधन व दारूगोळा वाहतूक करणारी वाहने, धावपट्टीवरील हालचाली छायाचित्र किंवा व्हिडीओच्या माध्यमातून समाज माध्यमांद्वारे उघड झाल्यास, त्याचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे या संदर्भात सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे.
धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ