

Airplane Food Quality Issue
पुणे : गोवा ते पुणे या स्पाइसजेटच्या फ्लाइट (SG1080 ) मधील प्रवासादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. पुण्यातील व्यावसायिक अभिजीत भोसले यांना क्रू मेंबरकडून दिलेल्या डाएट कोकच्या कॅनमध्ये धातूचे तीक्ष्ण तुकडे आढळले. या तुकड्यांमुळे त्यांच्या घशाला इजा झाली असून या संपूर्ण प्रकरणाबाबत स्पाइसजेट, कोका-कोला सह संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाला गांभीर्याने न घेतल्याची खंत अभिजीत भोसले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
भोसले म्हणाले, विमान प्रवासादरम्यान सॉफ्ट ड्रिंक घेतले. काही घोट घेतल्यानंतर घशात तीव्र वेदना जाणवू लागली व श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. माझे सहप्रवासी महेश गुप्ता आणि राजकुमार अगरवाल यांनी मला मदत केली. पुण्यात उतरल्यावर एअरलाईनने तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले. डाएट कोकच्या कॅनमध्ये धातूचे तुकडे स्पष्टपणे दिसत होते. मात्र क्रू मेंबरने तो कॅन कचऱ्यात टाकुन देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
यासंदर्भात स्पाइसजेट, कोका-कोला इंडिया, डीजीसीए, एफएसएसएआय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे वारंवार तक्रारी केल्या. तरीसुद्धा अद्याप कोणतीही ठोस व पारदर्शक कारवाई झालेली नाही. या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. स्पाइसजेट व कोका-कोलाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, दूषित कॅनच्या संपूर्ण बॅचचे तातडीने रिकॉल करण्यात यावे, अशी मागणी ही भोसले यांनी यावेळी केली.