

Agriculture Minister Dattatray Bharne visit Narayangaon Tomato Market
नारायणगाव : केंद्रात आणि राज्यात कृषीमंत्री मामाच आहे. आम्ही दोन्ही मामा कृषीमंत्री म्हणून शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन नवीन योजना आणून शेतकरी हिताचे निर्णय घेऊ, असे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान मामा नावाने ओळखले जातात. तर मंत्री भरणे यांनाही मामा नावाने संबोधले जाते, हाच धागा पकडून भरणे यांनी मिश्किल टिप्पणी केली.
शेतक-यांना शेती परवडत नाही, हा शेतक-यांचा समज असतो, ही अडचण किंवा चुक नसते. शेती करत असताना अचानक बाजारभाव कमी जास्त होतात, नुकसान होते, काही शेतक-यांना शेतीतून पैसे मिळतात, तर काहींना मिळत नाही. त्यामुळे शेती शाश्वत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, शेती शाश्वत होण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जुन्नर बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते टोमॅटोची बोली लावण्यात आली. त्यांनी पुकारलेल्या बोलीला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. व ज्या शेतकऱ्यांच्या टोमॅटोची बोली लावली, त्या शेतकऱ्याच्या टोमॅटोला तब्बल ७० रुपये किलोचा बाजारभाव मिळाला. बाजार समितीतील लिलावाचा अनुभव हा लहानपणापासुनचा असल्याचे सांगत ते म्हणाले की, माझ्या हातुन टोमँटोला भाव शेतक-यांना मिळाला, हा भाव चढत रहावो.
जय-पराजय प्रत्येकाच्या वाट्याला असतो. त्यामुळे पराभव पण स्वीकारला पाहिजे विजय, कारण हा विजयच असतो. मतदारांच्या मताची चोरी होते, हे म्हणणं चुकीचं आहे, तसं असतं तर आम्हीही आमच्या सहकार्यांचा पराभव होऊन दिला नसता. त्यामुळे मतांची चोरी होतेय, हे म्हणणं चुकीचं आहे, असे ठाम मत भरणे यांनी व्यक्त केले.