Pune News: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर महापालिकेच्या रखडलेल्या विकासकामांना गती मिळणार आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मंजूर झालेल्या साडेचारशे कोटींच्या कामांपैकी अनेक कामांचे कार्यादेश देण्यात आलेले असून, आता या कामांना मुहूर्त मिळणार आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सोमवारी संपुष्टात आली. निवडणूक आयोगाकडून महापालिकेला त्यासंबंधीचे पत्र पाठविण्यात आले आहे. या आर्थिक वर्षाचे पहिले तीन महिने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत गेले. त्यानंतर पुन्हा गेल्या दीड महिन्यापासून राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता होती.
त्यामुळे महापालिकेची विकासकामे मोठ्या प्रमाणात रखडली आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधी महापालिका प्रशासनाने घाईघाईने तब्बल साडेचारशे कोटींच्या विकासकामांना मंजुरी दिली होती. मात्र, त्यामधील अनेक कामांना प्रत्यक्षात कार्यादेश देणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे ही सर्व कामे आचारसंहितेत रखडली होती.
तसेच, महापालिकेच्या चालू अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या अनेक योजना आणि विकासकामे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे रखडली आहेत. त्यामुळे या सर्व कामांना आता पुन्हा वेग येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडे आता केवळ चार महिनेच असल्याने प्रशासनाकडून त्यासाठीची लगबग सुरू करण्यात आली आहे. सर्व विभागप्रमुखांना वित्तीय मान्यतेनुसार तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.