

पुणे: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलानंतर आता पुणे शहराध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. त्यासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली असून, शहराध्यक्ष- पदासाठी पुन्हा गटा-तटाचे राजकारणही सुरू झाले आहे.
काँग्रेस शहराध्यक्ष पदाची जबाबदारी अरविंद शिंदे यांच्याकडे आहे. मात्र, शिंदे यांना शहर काँग्रेसमधील एका गटाचा विरोध आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी या गटाने शहराध्यक्ष बदलण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्याला यश मिळू शकले नव्हते. विधानसभा निवडणुकीत या गटाने पुन्हा शहराध्यक्ष बदलासाठी थेट तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना साकडे घातले होते.
मात्र, पटोले यांनी दाद न दिल्याने या गटाने थेट दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन शहराध्यक्ष बदलाची मागणी केली होती. त्यासाठी लॉबिंगही केले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहराध्यक्ष बदलल्यास चुकीचा मेसेज जाईल, असे स्पष्ट करत वरिष्ठ नेत्यांनी ही मागणी अमान्य केली होती.
त्यानंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी आता हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. नवे प्रदेशाध्यक्ष नव्याने पक्ष संघटना बांधतील आणि पक्षात संघटनात्मक फेरबदल करतील, हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे शहर काँग्रेसमधून नव्या अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
आपल्या गटाचा आणि आपल्या मर्जीतील अध्यक्ष असावा, याद़ृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी माजी नगरसेवक चंदु कदम हे अध्यक्ष पदासाठी प्रयत्नशील होते. मात्र, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी अध्यक्ष पदाच्या स्पर्धेतून माघार घेतल्याचे सांगितले जात आहेत. अध्यक्ष पदासाठी सद्य:स्थितीला माजी नगरसेवक अविनाश बागवे, विरेंद्र किराड, दत्ता बहिरट, संजय बालगुडे, सुनील मलके अशी काही नावे चर्चेत आहेत.
त्यात बहिरट यांच्या नावासाठी काही प्रमुख पदाधिकारी अनुकूल आहेत. तर मलके यांच्या नावासाठी एक गट आग्रही आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बागवे यांच्या सारख्या तरुण चेहर्याला संधी मिळावी, असाही पक्षात मतप्रवाह आहे.मात्र, नव्या प्रदेशाध्यक्षांकडून गटा-तटाचे राजकारण न करता शहर संघटनेला ताकद देणारा विश्वासात घेऊन काम करणार्या व्यक्तीला शहराध्यक्ष पदाची संधी दिली जाईल, अशी असे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.