विरोधक दोन्हींकडूनही बोलतात. माझ्या लाडक्या बहिणींना ते खोडा घालत आहेत. मात्र, मी एक सांगतो, माझ्या लाडक्या बहिणी जोडा दाखवतील, असा टोला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पुणे शहरात तीन दिवसांपूर्वी हाच उद्घाटनाचा कार्यक्रम प्रत्यक्ष पंतप्रधानांच्या हस्ते होणार होता. मात्र, पावसामुळे तो रद्द करावा लागला. त्यावरून विरोधकांचे सुरू झाले. काहीही झाले की विरोधक दोन्हींकडून बोलतात. कार्यक्रम झाला असता तरी आणि नाही झाला तरी ते बोलतच असतात. आता मी अधिक काय बोलू, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे कटाक्ष टाकत म्हणाले, हे दादाच त्यांचा चांगला समाचार घेतात. त्यावर अजित पवार यांनी स्मितहास्य करत दुरूनच हात जोडले.
मुख्यमंत्री म्हणाले, बदलापूर घटनेतील आरोपीचे एन्काउंटर करावे लागले, त्यावरून विरोधक दोन्ही बाजूंनी बोलत आहेत. अहो, जर आरोपी बंदूक घेऊन गोळीबार करत असेल, तर पोलिसांनी काय बघत बसायचे का? त्यांच्या हातातील बंदुका शोभेसाठी आहेत का? पोलिसांनी गोळीबार केला नसता, तर आरोपी पळून गेला असता. तेव्हा तो आरोपी पोलिसांसमोरून पळाला, असा आरोपही विरोधकांनी केला असता.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरुवातीला पालकमंत्री या नात्याने भाषण केले. ते म्हणाले, पुणेकरांना सध्याच्या विकासकामांमुळे खूप त्रास होत आहे. मात्र, काही काळ हा त्रास सहन करा पुढील अनेक वर्षे तुम्हाला यामुळे चांगल्या सुविधा मिळतील. यानंतर त्यांनी कार्यक्रमाला आलेल्या सर्वांचे स्वागत केले.