अजित पवारांच्या आव्हानानंतर खा. डॉ.अमोल कोल्हेंची शरद पवारांशी भेट

अजित पवारांच्या आव्हानानंतर खा. डॉ.अमोल कोल्हेंची शरद पवारांशी भेट
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अजितदादांचे आव्हान मी गौरवच समजतो. त्यांनी त्यांचा दरारा केंद्रात दाखवावा आणि कांदा निर्यातबंदी तत्काळ उठवावी, अशी मागणी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. डॉ. कोल्हे यांच्याविरोधातील उमेदवार निवडून आणणारच, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिले होते. त्यानंतर डॉ. कोल्हे यांनी मंगळवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मोदी बागेतील कार्यालयात भेट घेतली. दरम्यान, या भेटीत शेतकरी मोर्चाबाबत चर्चा झाल्याचा दावा कोल्हे यांनी केला.
शरद पवार यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना कोल्हे म्हणाले, "दादा हे मोठे नेते आहेत, त्यांच्यासारखा नेता मला आव्हान देत असेल तर तो माझा गौरवच आहे.

जेव्हा त्यांना कान धरण्याचा अधिकार होता, तेव्हाच त्यांनी कान धरला असता तर बरे झाले असते. मी सर्वसाधारण कुटुंबातील सामान्य व्यक्ती आहे. त्यांनी काही राजकीय विधान केले असेल तर मी त्यांची भेटही घेईल. माझा कुठेही कारखाना नाही, माझी परदेशात कंपनी नाही, माझी कोणतीही चौकशी सुरू नाही. मी तत्त्व आणि मूल्यांना महत्त्व देतो, राजकारणातील सुसंस्कृतपणा कायम राहण्यासाठी मी पवार साहेबांसोबत आहे. ज्या पक्षाने मला उमेदवारी दिली, ज्या पक्षाचा उमेदवार म्हणून मला मतदारांनी खासदार केले, त्याच पक्षात मी आहे. मी 2019 ला जेथे होतो, तेथेच आजही आहे. ज्यांनी भूमिका बदलली, ती का बदलली, हे मला माहिती नाही, असेही कोल्हे म्हणाले.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी जनतेमध्ये आस्था आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे, त्यामुळे त्यांच्याप्रमाणे मी तत्त्व आणि नीतीमूल्यांना महत्त्व देतो, असेही ते म्हणाले.

डॉ. अमोल कोल्हे-पवार भेट…

काल बोललो, तेच फायनल; अजित पवारांचा पुनरुच्चार

खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्याविरोधातील उमेदवार निवडून आणणारच, हे मी कालच बोललो आहे. मी माझ्या आव्हानावर ठाम असून परत परत तो विषय कशाला? काल बोललो त्यात बदल नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मांजरी येथे आपल्या आव्हानाचा पुनरुच्चार केला.

मायबाप जनताच ठरवेल

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्या कडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, कोल्हे म्हणाले, "पुढील काळात तुम्हाला वेगळे दिसेल. जनता मायबाप ठरविणार आहे. आमदार आणि परिस्थिती वेगळी आहे."

भाव मिळालेला शेतकरी दाखवा

कांदा निर्यातबंदी केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपान येथून टि्वट करत केंद्र सरकार दोन लाख टन कांदा प्रतिक्विंटल 2410 रुपयांनी खरेदी करणार आहे, असे जाहीर केले होते. परंतु आता एवढे दिवस झाले, त्याची अंमलबजावणी नाही. प्रतिक्विंटल 2410 रुपये भाव मिळालेला कांदा उत्पादक शेतकरी मला दाखवा, असे आव्हानच कोल्हे यांनी दिले.

दादांनी त्यांचा दरारा केंद्रात दाखवावा

अजित दादांचा दरारा मोठा आहे. त्यांनी आपला हा दरारा कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी केंद्रात वापरला पाहिजे. तसेच राज्यात ते अर्थमंत्री असून, त्यांनी दूध उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी कोपरखळी कोल्हे यांनी मारली.

कोल्हे उवाचं…

  •  बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना, आढळवार यांना टोला…
  •  मला निवडूण आणण्यासाठी सर्वांचाच मोठा वाटा
  •  राजीनाम्याबाबत जी चर्चा झाली होती, ती खासगीत झालेली होती. खासगीत झालेली चर्चा सार्वजनिक करणे मला योग्य वाटत नाही.
  •  शिवनेरीच्या पायथ्यापासून शेतकरी मोर्चा काढला जाणार आहे. यासंदर्भात साहेबांचे मार्गदर्शन घेतले.
  •  केंद्र सरकारने निर्णय घेण्यापूर्वी शिरूर लोकसभा मतदारसंघातील पाच लाख नागरिकांचे लसीकरण झाले.
  • पुणे- नाशिक रेल्वेचा प्रश्न सुटत आला आहे. बैलगाडा शर्यतीचा प्रश्न सुटला आहे. कामाच्या जोरावर ही गोष्ट समोर येणे गरजेचे आहे.
  •  मी माझे उत्पन्नाचे साधन आजही उजळ माथ्याने चारचौघात सांगू शकतो.
  •  पालकमंत्री म्हणून अजितदादांनी काही विकासकामांची पाहणी केली असेल तर चांगलेच आहे.
  • मांजरी येथील उड्डाणपुलासह इतर कामांची मी सहा महिन्यांपूर्वी पाहणी केली होती.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news