

पुणे: तनिषा ऊर्फ ईश्वरी भिसे या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये 2020 पासून उपचार घेत होत्या. त्यांची 2022 मध्ये दीनानाथमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. रुग्णाला सुखरूप गर्भधारणा आणि प्रसूती होण्याची शक्यता नसल्याने मूल दत्तक घेण्याविषयी सल्ला देण्यात आला होता, असा खुलासा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने सादर केलेल्या अहवालात केला आहे.
तनिषा भिसे (रा. कोथरूड) या गर्भवतीला दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यासाठी पैसे मागितल्याने तिला दुसर्या खासगी रुग्णालयात नेले व तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. दीनानाथ रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनुजा जोशी, अतिदक्षता विभागप्रमुख डॉ. समीर जोग आणि प्रशासक सचिन व्यवहारे या सदस्यांसह चौकशी समिती स्थापन अहवाल शासनाला सादर करण्यात आला.
संकेतानुसार आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रसूतीपूर्व तपासणी कमीत कमी 3 वेळा करून घेणे आवश्यक असते. मात्र, संबंधित रुग्णाची तपासणी रुग्णालयात केली नाही आणि त्याबाबतची माहितीही रुग्णालयास देण्यात आली नाही. रुग्ण 15 मार्च रोजी इंदिरा आयव्हीएफचे रिपोर्ट घेऊन डॉ. सुश्रुत घैसास यांना भेटल्या. त्या वेळी डॉ. घैसास यांनी त्यांना जोखमीच्या व धोकादायक गर्भारपणाबद्दल कल्पना दिली होती व दर 7 दिवसांनी तपासणीस बोलावले होते. मात्र त्या नियोजित वेळेत आल्या नाहीत. त्यांनी दुसर्या रुग्णालयातही त्यांची कर्करोगाची माहिती लपवल्याचे दिसून येत आहे, असे अहवालात म्हटले आहे.
रुग्णाच्या नातेवाइकांनी वैद्यकीय संचालक डॉ. केळकर यांना फोन केला व आपली अडचण सांगितली. त्यावर डॉक्टरांनी जमतील तेवढे पैसे भरा, असे सांगितले. रुग्णाचा कोणीही नातेवाईक प्रशासन अथवा चॅरिटी डिपार्टमेंट इथे प्रत्यक्ष भेटला नाही. डॉ. केळकर यांचे ऑपरेशन संपल्यावर त्यांनी डॉ. घैसास यांना फोन केला तेव्हा त्यांनी रुग्ण न सांगता निघून गेल्याचे कळवले.
पैशांची तजवीज न झाल्यास रुग्णाच्या पतीला डॉ. घैसास यांनी ससून येथे जाण्याचा सल्ला दिला होता. जेणेकरून आईची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया व होणार्या अपुर्या वाढीच्या गर्भाची शुश्रूषा ससून येथील एनआयसीयूमध्ये व्यवस्थित होईल. दरम्यानच्या काळात एका नर्सने नातेवाईक निघून गेल्याचे सांगितले. थोड्या वेळाने डॉ. घैसास यांनी रुग्णाच्या पतीला फोन केला, तो त्यांनी उचलला नाही. त्यामुळे 28 मार्चच्या दुपारनंतर रुग्णाचे काय झाले, याबद्दल डॉ. घैसास व रुग्णालय प्रशासन यांना काहीच कल्पना नव्हती.
28 मार्च रोजी काय घडले..?
रुग्णालयाच्या अहवालात नमूद केल्यानुसार, 28 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता रुग्ण, पती व नातेवाईक डॉ. घैसास यांच्या बाह्यरुग्ण विभागात आले. ते तातडीच्या वैद्यकीय कक्षात किंवा लेबर रूममध्ये आले नव्हते. डॉ. घैसास यांनी महिलेची तपासणी केली. ती पूर्णपणे नॉर्मल होती व तिला कुठल्याही तातडीच्या उपचारांची गरज नव्हती. परंतु जोखमीची अवस्था लक्षात घेता निरीक्षणासाठी भरती होण्याचा सल्ला दिला.
त्याचबरोबर प्रसूती आणि सिझेरियन सेक्शनमधील धोक्याची माहिती देण्यात आली. तसेच नवजात अर्भक कक्षाच्या डॉक्टरांशी त्यांची भेट करून देण्यात आली. कमी वजनाची, 7 महिन्यांची जुळी मुले, जुन्या आजाराची गुंतागुंत व कमीत कमी 2 ते 2.5 महिने एनआयसीयूचे उपचार लागतील हे समजावून सांगितले. त्यासाठी साधारणपणे 10 ते 20 लाख खर्च येऊ शकतो, याची कल्पना देण्यात आली. त्यावर रुग्णाच्या नातेवाइकांनी तुम्ही भरती करून घ्या व मी प्रयत्न करतो, असे सांगितले.
मणिपाल प्रशासन म्हणते...
मणिपाल हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, मणिपालमध्ये दाखल होताना रुग्णाची अवस्था अत्यंत गंभीर होती. तिला तीव्र प्री-एक्लॅम्पसियाचे (रक्तदाब खूप वाढणे आणि मूत्रामध्ये प्रथिनांची मात्रा वाढणे) निदान झाले. तसेच गर्भावस्थेतील रक्तस्राव, हृदयविकाराचा झटका व इतर वैद्यकीय गुंतागुंत झाली होती. तिला हृदयविकाराच्या झटक्यातून यशस्वीपणे वाचविण्यात आले; परंतु त्या वेळेपर्यंत तिच्या मेंदूला आवश्यक तितका ऑक्सिजन न मिळाल्याने इजा (हायपॉक्सिक) झालेली होती. प्रयत्नांनंतरही मेंदूच्या दुखापतीत सुधारणा होऊ शकली नाही आणि शेवटी ती दगावली.
सूर्या हॉस्पिटल प्रशासन म्हणते...
वाकड येथील सूर्या मदर अँड चाईल्ड सुपरस्पेशालिटी रुग्णालय येथे या महिलेची 29 मार्च रोजी प्रसूती झाली. रुग्णालयाचे संचालक डॉ. सचिन शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला असून, त्यापैकी एकीचे वजन 1100 ग्रॅम, तर दुसरीचे 600 ग्रॅम आहे. सुरुवातीला त्यांना नवजात शिशू कक्षातील व्हेंटिलेटरवर ठेवले. सध्या कमी तीव्रतेचे श्वासोच्छ्वास असलेल्या सी पॅप मशिनवर उपचार सुरू आहेत. त्यांची तब्येत स्थिर असून, थोड्या प्रमाणात दूधही देण्यात येत आहे. महिलेने बाळांना जन्म दिल्यानंतर व तब्येत अधिक बिघडल्यावर तिला दुसर्या रुग्णालयात संदर्भित केले होते.
तनिषा भिसे यांच्यावर 2022 मध्ये दीनानाथ रुग्णालयामध्ये 50 टक्के धर्मादाय निधीचा लाभ घेऊन शस्त्रक्रिया झाली होती. रुग्णासाठी गर्भधारणा आणि प्रसूती धोकादायक असल्याची कल्पना देण्यात आली होती. रुग्णालयातील डॉक्टरांचा यामध्ये दोष नाही. आमची बाजू असलेला अहवाल शुक्रवारी शासनाला सादर केला आहे.
- डॉ. धनंजय केळकर, वैद्यकीय संचालक, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय
दीनानाथ रुग्णालयातील घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या चौकशीत जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. राज्यातील कुठल्याही रुग्णालयात यापुढे अशी दुर्दैवी घटना घडणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील.
- माधुरी मिसाळ, राज्यमंत्री वैद्यकीय शिक्षण
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील प्रकरणाची मी नोंद घेतली आहे. सिव्हिल सर्जन यांच्याकडून एक अहवाल मागवला आहे. त्यातून येणार्या निष्कर्षांनुसार उचित कारवाई होईल. आपण कुठल्याही हॉस्पिटलला शासकीय जमीन देतो, तेव्हा काही अटी असतात. त्या पाळल्या गेल्या आहेत का, याचा अभ्यास केला जाईल आणि योग्य पावले उचलली जातील.
- जितेंद्र डुडी, पुणे जिल्हाधिकारी