पिंपरखेड: विहिरी, कूपनलिकांनी गाठलेला तळ, कडक उन्हाचा चटका, त्यामुळे पिकांची तहान भागविणे जिकिरीचे ठरत आहे. शेतकरी मेटाकुटीला आला असताना महावितरणकडून अचानक दोन तीन तास सक्तीचे भारनियमन होत असून, उपलब्ध पाणीही पिकांना देता येत नसल्याने ऐन उन्हाळ्यात ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी बिकट अवस्था झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.
शिरूर तालुक्यातील बेटभागात मागील वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने भुगर्भातील पाणीपातळीत अपेक्षित वाढ न झाल्याने तसेच पाण्याचे स्रोतही लवकरच आटल्याने या वर्षी पिंपरखेड, काठापूर, चांडोह, फाकटे, वडनेर, जांबुत या परिसरात मार्च महिन्यातच विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत घट होऊन वाढलेल्या तापमानाने पाणी झपाट्याने कमी झाले. सध्या अनेक कूपनलिकांचे पाणी कमी झाले असून, विहिरी दोन-तीन तासांवर आल्या आहेत.
ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या संकटात पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी तारेवरची कसरत करत असताना वीजटंचाईच्या संकटामुळे शेतीपंपासाठी अचानक सक्तीचे भारनियमन करण्यात येत आहे. पिंपरखेड वीज उपकेंद्रावरून वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार शेतींपपासाठी अतिरिक्त भारनियमन करण्यात येत आहे.
दिवसभरात दोन ते तीन तास वीजपुरवठा बंद राहत आहे. घोड नदीवरील बंधार्यात पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, शेतीपंपासाठी अतिरिक्त भारनियमन करण्यात येत असल्याने शेतकर्यांचे पाणी नियोजन कोलमडले आहे. कोणतीही पूर्वसूचना वेळापत्रक न देता महावितरण कंपणीकडून अचानक दोन ते तीन तास सक्तीचे भारनियमन लादले जात असल्याने उपलब्ध पाणीही पिकांना देता येत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.