महाळुंगे: पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून चिंबळी फाटा (ता. खेड) इंद्रायणी नदी येथून अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली. यामध्ये महामार्गाच्या मध्यापासून साडेबावीस मीटर अंतरापर्यंतचे पत्राशेड व इतर बांधकामे पाडण्यात आली. मात्र, ही कारवाई करताना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न दिल्याने व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप स्थानिक व्यावसायिकांनी केला आहे.
राष्ट्रीय महामार्ग आणि राज्यमार्गावर होणारी वाहतूक कोंडी हटविण्यासाठी पुढील 30 दिवसांत राष्ट्रीय महामार्ग आणि राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूस अनधिकृत व अतिक्रमण केलेली दुकाने, गाळे, बांधकामे व इतर तात्पुरत्या स्वरूपाच्या बांधकामांवर संबंधित शासकीय विभागांनी संयुक्तपणे कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले.
परंतु, कुठलीही पूर्वसूचना न देता सोमवारी (दि. 3) सकाळी दहा वाजता चिंबळी फाटा येथे या कारवाईला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे व्यावसायिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, व्यावसायिकांनी याबाबत विरोध केला. परंतु, संबंधित अधिकार्यांनी विरोधाला न जुमानता कारवाई सुरूच ठेवली.
यामुळे व्यावसायिक व स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. यापुढील काळात वर्षातून दोनवेळा अशा प्रकारच्या कारवाईचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले तसेच नागरिकांनी परवानगी घेऊन बांधकामे करावीत, अशा सूचना देण्यात आल्या.
आम्हाला कुठलीही पूर्वसूचना न देता सोमवारी सकाळी दहाच्या दरम्यान जेसीबी व क्रेन आदीच्या साह्याने बांधकामे पाडण्याचे काम सुरू करण्यात आले. अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी आमचा विरोध नाही. परंतु, याची कुठलीही कल्पना न देता कारवाई केल्याने आमच्या व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
- गजानन कदम, फुटवेअर व्यावसायिक, चिंबळी फाटा
पुणे-नाशिक महामार्गावर झालेल्या अनधिकृत बांधकामांवर झालेल्या कारवाईला आमचा विरोध नाही. परंतु, आम्हाला कुठलीही पूर्वसूचना न देता व कोणतीही चौकशी न करता ही कारवाई केल्यामुळे आमचे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिक्रमण काढलेल्या महामार्गालगत मोकळ्या जागेमध्ये रस्त्याचे रुंदीकरण त्वरित करावे.
- गणपत मुर्हे, स्थानिक नागरिक, चिंबळी फाटा