ओतूर: जुन्नर विधानसभेसाठी बुधवारी (दि. 20) मतदान होत असून प्रचाराची मुदत संपली आहे. त्यानुषंगाने ओतूर पोलीस ठाण्याच्या वतीने एक नोटीस जारी करण्यात आली आहे. सोशल मीडियावर कोणीही राजकीय प्रचाराची पोस्ट करू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी या नोटिशीद्वारे दिला आहे.
या नोटीसमध्ये म्हटले आहे की, ’आपण आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपचे अॅडमिन आहात. आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये कोणकोणते संदेश येतात किंवा पाठविले जातात, याबाबत आपणास पूर्ण कल्पना आहे. जुन्नर विधानसभा निवडणूक प्रचाराची मुदत सोमवारी (दि. 18) सायंकाळी 6 वाजता संपली आहे.
मुदत संपल्यानंतर जुन्नर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी फेसबुक, युट्यूब चॅनेल, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणुकीबाबत स्टेटस, पोस्ट, व्हिडीओ प्रसारित करू नयेत. याबाबत ग्रुपमधील सर्व सदस्यांना पूर्वसूचना द्याव्यात तसेच ग्रुप सेटिंगमध्ये बदल करून Only for Admin अशी सेटिंग करावी.
व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये निवडणूक प्रचाराबाबत कोणतीही पोस्ट प्रसारित होणार नाही, याबाबत ग्रुप अडमिन या नात्याने दक्षता घ्यावी. ग्रुपमध्ये निवडणूक प्रचाराबाबत कोणतीही पोस्ट प्रसारित होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच या नोटिशीचा उपयोग कोर्टात पुरावा म्हणून सादर करण्यात येईल, असा इशाराही थाटे यांनी नोटिशीत दिला आहे.