सासवड: शहरातील वाहतूक पोलिसांनी चारचाकी वाहनांच्या काचांना काळी फिल्म बसविणार्या वाहनचालकांविरुद्ध जोरदार मोहीम राबविली. मागील 15 दिवस राबविलेल्या विशेष मोहिमेत वाहतूक ई-चलन मशिनद्वारे एकूण 465 वाहतूक केस करून 3 लाख 68 हजार 100 रुपये दंड वसूल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले.
सासवड शहरात अनेकदा तरुण मुले बुलेटच्या पुंगळ्या काढून कर्णकर्कश फटाक्यासारखे आवाज करत रस्त्यावरून सुसाट वाहने चालवतात. कानठळ्या बसेल अशा आवाजात हॉर्न वाजवणे, रेसर बाईक भरधाव वेगात चालवतात. एका मोटारसायकलवर तीन-तीन जण फिरतात, चारचाकी वाहनांना काळ्या रंगाच्या फिल्म लावून फिरतात. अशा प्रकरणांची संख्या वाढती आहे.
रात्री-अपरात्री अशा अनेक मोटारसायकलींमुळे झोपमोड होण्याबरोबरच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण दचकून उठत असल्याचे प्रकार अलीकडे सासवड शहरात वाढले होते. या पार्श्वभूमीवर सासवड पोलिस ठाण्यात अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्याने वाघिरे महाविद्यालय परिसर, पुरंदर कॉलेज परिसर, जेजुरी नाका, एसटी बसस्थानक परिसरात पोलिसांनी नाकाबंदी करत अल्पवयीनांच्या ताब्यातील 13 बुलेट, 1 स्पेलंडर दुचाकीवर कारवाई केली.
ही कामगिरी उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे व पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वैभव सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक श्रीराम पालवे, गणेश पाटील, अर्जुन चोरगे, सहायक फौजदार जयसिंग जाधव, पोलिस हवालदार सुरज नांगरे, विशाल जाधव, लियाकत मुजावर, अभिजित कांबळे, संतोष शिंदे, योगेश गरुड, विकास ओमासे, तेजस शिवतरे, ट्राफिक वॉर्डन राहुल भुजबळ यांच्या पथकाने केली.
सुज्ञ नागरिकांनी कायद्याचे काटेकोर पालन करताना 18 वर्षांखालील आपल्या पाल्याकडे मोटारसायकली व इतर तत्सम वाहने देऊ नयेत. पालकांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असेल, तर पालकांवर कडक कारवाई केली जाईल. यापुढील काळात कारवाईची मोहीम आणखी तीव्र केली जाईल.
- ऋषिकेश अधिकारी, पोलिस निरीक्षक, सासवड