भिगवण: राज्यातील माशांचे कोठार, अशी ओळख असलेल्या उजनीतील बेकायदा मासेमारीमुळे मत्स्य उत्पादनात मोठी घट निर्माण होऊन पिढीजात व भूमिपुत्रांचा रोजगार संकटात सापडला होता. फिशमाफियांनी बेकायदेशीर मत्स्यबीज व लहान मासे मारण्याचा सपाटा लावला होता.
अखेर अशा अवैध मासेमारीवर जलसंपदा विभागाच्या पथकाने शनिवारी (दि. 8) कारवाई करत त्यांचे साहित्य नष्ट करण्याची जोरदार मोहीम हाती घेतली. परिणामी, बेकायदेशीर मासेमारी करणार्या फिशमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता एन. एम. खाडे, शाखाधिकारी महेश दळवी तसेच आकाश पवार, सचिन ठोंबरे, पल्लवी अंबोरे, ज्योती भिसे आदींच्या पथकाने शनिवारी सकाळपासूनच खानोटा (ता. दौंड) व परिसरात कारवाई सुरू केली. यामध्ये लहान आकाराच्या वडापच्या जाळ्या नष्ट करण्यात आल्या.
गेल्या वर्षी उजनीत मत्स्यबीज सोडल्यानंतर या मत्स्यबीजाचे व इतर जातींच्या माश्यांचे संगोपन होण्यासाठी कोणत्याही आकाराच्या वडाप, पंड्या जाळ्यांच्या साहाय्याने मासेमारी अथवा वाहतूक करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. गेल्या वर्षी या बंदीचे पालन करण्यात आल्याने या वर्षी मत्स्य उत्पादनात कमालीची वाढ झाली आहे.
परंतु उजनीचे पाणी कमी होताच फिशमाफियांनी वडाप, पंड्याच्या साहाय्याने मासेमारी करण्याचा धडाका सुरू केला आहे. यामुळे बहुतांश मच्छिमार हवालदिल झाला होता. त्यातून ही बेकायदा मासेमारी त्वरित बंद करण्याच्या मागणीने जोर धरला होता, त्यामुळे शनिवारी जलसंपदा विभागाने कारवाईचा बडगा उगारला.
ही कारवाई सुरू होताच अनेकांनी पळ काढल्याचे कळते. दरम्यान यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे खाडे यांनी सांगितले; मात्र फिशमाफियांवर गुन्हेदेखील दाखल करण्याची मागणी मच्छिमार वर्गाने केली आहे.
उजनीला धोका तरी देखील...
उजनी धरणात परराज्यातील मच्छिमारांच्या आडून उजनीच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचा अहवाल खुद्द शासनाचा आहे. तरी देखील बेकायदेशीर परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे उजनीत दाखल होऊन त्यांची साधी चौकशी केली जात नसल्याने अवैध मासेमारीला अधिकार्यांचे बळ मिळत आहे का, अशी शंका निर्माण होत आहे. बेकायदा मासेमारीबरोबरच चोरीची वीज, उघड्यावर शौचालय, पक्ष्यांची शिकार, बालकामगार असे अनेक बेकायदा गोष्टी परप्रांतीयाकडून होत असल्याचा आरोप मच्छिमार करीत आहेत.
गेल्या वर्षापासून मत्स्य उत्पादनात वाढ
गेल्या वर्षापासून मत्स्यबीज सोडताच अवैध मासेमारीवर बंदी घातल्याने याचा दृश्यपरिणाम यंदा दिसू लागला आहे. नैसर्गिक प्रजनन होणारे शिवडा, सुंबर, कोळीस, गुगळी, शिंगटा, कानस आदी जातींसह प्रमुख कार्प असलेले कटला, रोहू, मृगल या माशांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. यातून मच्छीमारांना अच्छे दिन आले आहेत.
समितीने संयुक्त कारवाई करणे गरजेचे
बेकायदा मासेमारीमुळे धरणातील संपुष्टात आलेली मत्स्यसंपदा पूर्ववत येण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कडक सूचनेनंतर जिल्हाधिकारी यांनी समिती देखील स्थापन केलेली आहे. परंतु, अधिकारीच या सूचनेला केराची टोपली दाखवत असल्याने फिशमाफियांचे बळ वाढत आहे. वास्तविक समितीत इंदापूर, करमाळा, कर्जत, माढा तालुक्यांतील तहसीलदार तसेच पोलिस, प्रदूषण मंडळ आदींचा समावेश आहे. सध्या जलसंपदा विभागाकडून कारवाई सुरू झाली असली, तरी नेमलेल्या समितीने संयुक्त कारवाई केल्यास ती प्रभावी ठरेल, असे मत व्यक्त होत आहे.