पुणे : नव्या दूध मानकानुसार गायीच्या दुधाला ३३ रुपये दर द्या; अखिल भारतीय किसान सभेची मागणी

पुणे : नव्या दूध मानकानुसार गायीच्या दुधाला ३३ रुपये दर द्या; अखिल भारतीय किसान सभेची मागणी
Published on
Updated on
पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात संकलित होणार्‍या गायीच्या दुधाचे मानक पुर्वीच्या 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ गुणप्रतिऐवजी आता 3.2 फॅट व 8.3 एसएनएफ गुणप्रतीची वर्गवारी कायदेशिर मानकावर  शासनाने शिक्कामोर्तब केले आहे. तसा  शासन निर्णय राज्याच्या दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाने बुधवारी (दि.29) जारी केला आहे. यामुळे कमी गुणप्रतिचे दूध सांगून दर कमी देण्यास चाप बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान,घोषित केलेल्या दुध मानकास प्रति लिटरला 33 रुपये दर देण्याची मागणी अखिल भारतीय किसान सभेने केली आहे.
केंद्र सरकारने अन्न सुरक्षा व मानक अधिसूचनेतील उपनियमातील वेगवेगळ्या दुधातील किमान स्निग्धांश (फॅट) व किमान स्निग्धांशाव्यतिरिक्त इतर घन पदार्थ (एसएनएफ) यांची सुधारित मानके निश्चित केली आहेत. या अधिसूचनेचा आधार घेऊन राज्यात संकलित होणार्‍या वेगवेगळ्या वर्गवारीच्या दुधातील गुणप्रत स्विकृतीकरिता एकसुत्रता येण्यासाठी फॅट व एसएनएफ निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीर होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाच्या दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या उप सचिव अश्विनी यमगर यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
या बाबत अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सह सचिव डॉ. अजित नवले म्हणाले, शासनाने 22 नोव्हेंबरच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आता शासना आदेश जारी केला आहे. मात्र 3.2 फॅट व 8.3 एसएनएफ गुणप्रतिच्या दुधाला प्रति लिटरला किती भाव देणार? हे जाहीर केलेले नाही. नवीन मानकानुसार गाय दुधाला प्रति लिटरला 33 रुपये दर घोषित करण्याची आमची मागणी आहे. काही लोक आता 3.2 व 8.3 या गुणप्रतिच्या  दुधाला 34 रुपये मिळणार म्हणत सरकारचे स्वागत करत सुटले आहेत. पण ते त्यांचे अज्ञान आहे. म्हणून राज्य सरकारने आता मात्र 3.2 फॅट व 8.3 एसएनएफ गुणप्रतिच्या दुधाला बेस रेट जाहीर करावा व कंपन्या व संघांनी तो दिला नाही तर त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले.
राज्य सरकारने घोषित केलेल्या मानकानुसार सहकारी दूध संघ दूध स्विकारीत होते आणि दरही देत आलेले आहेत. सद्यस्थितीत सहकारी दूध संघाकडे अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर झालेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने मागे राबविलेल्या योजनेनुसार महानंदमार्फत अतिरिक्त दूध खरेदी करुन दूध पावडर तयार करावी आणि त्या दुधाला प्रति लिटरला पाच रुपये अनुदान दयावे. अन्यथः सहकारी दूध संघाचा तोटा वाढून अडचणीत भर पडणार आहे. त्यामुळे शासनाने अतिरिक्त दुधाला अनुदान देण्याबाबत गांभीर्याने विचार करावा. तसेच दुधाच्या नव्या मानकाचा प्रति लिटरचा दर प्राप्त गंभीर स्थितीचा विचार करुनच जाहिर करणे अपेक्षित आहे.
– गोपाळराव म्हस्के , अध्यक्ष, राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news