

भीमाशंकर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रीची शासकीय महापूजा मंगळवारी (दि. २५) मध्यरात्री १२ वाजता माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सपत्नीक करून पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. त्यानंतर लगेच भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले आहे. सुमारे साडेतीन लाख भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी दर्शनबारीसह मुख दर्शन व पासची सुविधा भाविकांसाठी देवस्थानतर्फे करण्यात आली होती. सुमारे दीड किलोमीटर अंतरापर्यंत दर्शनरांग होती.
'डांकिने भीमाशंकर की जय' व 'जंंगलवस्ती भीमाशंकर की जय'च्या जयघोषाने परिसर दुमदुमुन गेला. सुमारे दीड किलोमीटरपर्यंत दर्शनरांग लावून भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. महाशिवरात्रीच्या पहाटे शिवलिंगाचे दर्शन महत्त्वाचे मानले जात असल्याने भाविक दोन दिवस आधीच भीमाशंकरमध्ये मुक्कामी होते. दरम्यान, भीमाशंकर मंदिरास फुलांची आकर्षक सजावट व विद्युतरोषणाई भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या वतीने करण्यात आली होती.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अभयारण्यात जंगलात वसलेल्या या मंदिरात महाशिवरात्र यात्रा मोठ्या उत्साहात करण्यात आली. मागील अनेक वर्षांपासून मंदिर परिसरात महाशिवरात्रीची यात्रा आयोजित करण्यात येत आहे. महाशिवरात्रीच्या पहाटे शिवलिंगाचे दर्शन महत्त्वाचे मानले जात असल्याने भाविक दोन दिवस आधीच भीमाशंकरमध्ये मुक्कामी आले होते. त्यामुळे भक्तनिवास, हॉटेल आणि इतर काही ठिकाणी नागरिकांनी भाविकांची राहण्याची व्यवस्था केली होती.
या प्रसंगी पूर्वाताई वळसे पाटील, आमदार महेश लांडगे, सचिन अहिर, आदिवासी नेते सुभाष मोरमारे, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, प्रकाश घोलप, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष मारुती लोहकरे, देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, प्रदीप वळसे पाटील, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, खेड व आंबेगावचे तहसीलदार व सरपंच दत्ता हिले आदी उपस्थित होते. शासकीय विभागाचे सर्व अधिकारी नियंत्रण कक्षात उपस्थित होते.
या यात्राकाळात घोडेगाव ते भीमाशंकर साइडपट्टी भरण्यात आली नाही. यासह रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक तसेच विविध ठिकाणी गतिरोधक देखील उभारण्यात आले नाहीत. परिणामी मोठ्या गर्दीमुळे या रस्त्यावर अनेक छोटे-मोठे अपघात घडले आहेत.
यात्रेसाठी एसटी महामंडळाने मिनी बस व मोठ्या गाड्यांची व्यवस्था केली होती. पोलिसांकडून वाहनतळ ते भीमाशंकर मंदिर परिसरात घोडेगाव व खेड पोलिस ठाण्यांतर्गत २२ पोलिस अधिकारी, १३४ पोलिस कर्मचारी आणि ६० होमगार्ड, असा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आरोग्य विभाग, महवितरण विभाग, महसूल विभाग, पंचायत विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यात्रेत काही अनुचित प्रकार घडू नयेत आणि भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठी प्रशासन काळजी घेत होते.
महाशिवरात्रीच्या काळात भीमाशंकर येथे शिवलिंगाच्या दर्शनाबरोबरच कोकणकड्याच्या बाजूला पारंपरिक बाजार भरतो. या यात्रेत अजूनही जुन्या पध्दतीनेच व्यवहार चालतात. मध, कडधान्य, तांंदूळ, औषधी वनस्पती यांची खरेदी-विक्री येथे होते. या बाजारात खरेदी करण्यासाठी कोकाणातून लोक येतात. कोकणातील नागरिक त्यांच्याकडील वस्तू देऊन घाटावरील मसाला आणि इतर वस्तू देतात. यंदाही कोकण कड्याजवळ हा मोठा बाजार भरला आहे. या बाजाराला देखील चांगला प्रतिसाद मिळाला.