AAP on tree cutting
पुणे: पुण्यात विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोडण्यास परवानगी देण्यात आली आहे. उद्यान विभागाच्या परवानगीने महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांमार्फत तब्बल 25 हजार झाडे तोडण्यात आली असूनही, त्याबदल्यात साडेतीन लाख झाडे लावणे अपेक्षित असताना एकही झाड लावण्यात आलेले नाही, असा गंभीर आरोप आम आदमी पक्षाचे (आप) अॅड. कुणाल घारे यांनी गुरुवारी (दि. 31) पत्रकार परिषदेत केला. याविरोधात 4 ऑगस्टला उद्यान विभागासमोर झाडांची अंत्ययात्रा काढून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात येईल, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.
पुणे महानगरपालिकेतील पत्रकार कक्षात घेतलेल्या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, अॅड. अमोल काळे आदी उपस्थित होते. अॅड. घारे म्हणाले, ‘पुण्यात विविध विकासकामे सुरू आहेत. ही कामे करताना मध्ये येणारी झाडे तोडण्याची परवानगी महानगरपालिकेच्या उद्यान विभागाला मागण्यात आली आहे. (Latest Pune News)
गेल्या 18 महिन्यांत 25 हजार झाडे तोडण्यास महानगरपालिकेने परवानगी दिली असून, त्याबदल्यात झाडांची पुनर्लागवड करणे कायद्यानुसार बंधनकारक असताना एकाही झाडाची लागवड करण्यात आलेली नाही. बांधकाम व्यावसायिकांकडून अनामत रक्कम घेऊन वृक्षतोडीस परवानगी दिली जाते. मात्र, झाडे लावली जात नाहीत आणि पालिकेकडून फक्त रक्कम जप्त केली जाते. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो आहे, असेदेखील घारे म्हणाले.
महापालिकेच्या वृक्षतोड धोरणाचा निषेध करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने 4 ऑगस्ट 2025 रोजी ‘झाडांची अंतिम यात्रा’ हे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात येणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर ते महापालिका इमारत असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाचा उद्देश बेकायदेशीर वृक्षतोड रोखणे, पर्यावरणविषयक जनजागृती करणे, 22.5 कोटी रुपये निधीचा योग्य वापर सुनिश्चित करणे आणि महापालिकेवर कायदेशीर व सामाजिक दबाव निर्माण करणे असा आहे. पुणेकरांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आम आदमी पक्षाने केले आहे.
एप्रिल 2022 ते डिसेंबर 2023 या कालावधीत महापालिकेने 10,502 झाडे तोडण्यास व 11,860 झाडांचे स्थलांतर करण्यास परवानगी दिली. त्यामुळे 3.4 लाख झाडांची पुनर्लागवड अपेक्षित होती. यासाठी विविध संस्थांकडून 22.5 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात एकाही झाडाची लागवड करण्यात आली नाही, असा आरोप घारे यांनी केला.