आधार नोंदणी होणार वेगवान; पुणे जिल्ह्याला मिळणार 203 नवीन यंत्रे

आठवड्यात मिळणार नवी आधार यंत्रे
Pune News
आधार नोंदणी होणार वेगवान; पुणे जिल्ह्याला मिळणार 203 नवीन यंत्रे File Photo
Published on
Updated on

पुणे: नवीन आधार नोंदणी तसेच दहा वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या आधार क्रमांकाचे अद्ययावतीकरण करण्यासाठी आवश्यक असणार्‍या आधार यंत्रांचा तुटवडा लक्षात घेऊन राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने 203 यंत्रे पुणे जिल्ह्याला मिळणार आहेत.

पुणे जिल्ह्याला 2014 मध्ये एकूण 3 हजार 873 आधार यंत्रे देण्यात आली होती. मात्र, त्यातील 2 हजार 558 यंत्रेच कार्यरत आहेत, तर उर्वरित 1 हजार 315 यंत्रे नादुरुस्त असल्याने नवीन आधार तसेच जुन्या आधार क्रमांकांचे अद्ययावतीकरण रखडले आहे. त्यामुळे नवीन यंत्रे देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडून राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे करण्यात आली होती.

राज्याचे माहिती व तंत्रज्ञानमंत्री आशिष शेलार यांनी या संदर्भात तातडीने बैठक घेऊन नव्या 4 हजार 166 यंत्रांची पूर्तता करण्याचे आदेश दिले. ही यंत्रे देण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना एक कार्यपद्धती निश्चित करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा समन्वयक अधिकारी, जिल्हा प्रकल्प प्रबंधक आणि जिल्हा आयटी समन्वय यांना काम सोपविण्यात आले आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी कार्यपद्धती निश्चित केल्यानंतर ही यंत्रे देण्यासाठी एका परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणात उत्तीर्ण झालेल्यांकडे यंत्रे सोपविली जाणार आहे. त्यानंतरच या यंत्रांच्या माध्यमातून नवीन आधार तसेच आधार अद्यवतीकरण होणार आहे. तोपर्यंत जुन्या यंत्रांवरच कामकाज करावे लागणार आहे. दुसर्‍या टप्प्यासाठी आणखी यंत्रे येणार असून, जिल्ह्याला एकूण 338 यंत्रे मिळणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली.

जिल्ह्यातील 66 हजार जणांचे आधार अपडेट

जिल्ह्यात सध्या एकूण 556 यंत्रे कार्यरत आहेत. त्यात जिल्हा प्रशासनाकडे 155, सामायिक सुविधा केंद्रांकडे 108, बँक 100, पोस्ट 84 महिला व बालविकास विभाग 72 तर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडे 37 यंत्रे आहेत. जिल्ह्यात 1 ते 17 फेब्रुवारी दरम्यान नवीन आधार क्रमांकासाठी 6 हजार 41 जणांनी नोंदणी केली असून, तब्बल 60 हजार 753 जणांनी अद्ययावतीकरण केले आहे. दोन्ही मिळून ही संख्या 66 हजार 794 इतकी आहे, अशी माहिती जिल्हा समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पल्लवी घाडगे यांनी दिली.

आठवड्यात मिळणार नवी आधार यंत्रे

राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांसाठी 2 हजार 911 आधार यंत्रे दिली जाणार आहेत. त्यात सर्वाधिक 203 यंत्रे पुणे जिल्ह्याला मिळणार आहेत. आठवडाभरात ही यंत्रे मिळणार असून, राज्यासाठी आणखी सुमारे 1 हजार 200 यंत्रांची मागणी नोंदविण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news