

पुणे: फायर कोल अंगावर पडल्याच्या कारणातून टोळक्याने तरुणाला गाठून लाकडी बांबूने बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळाल्यावर जाब विचारल्याने या गुंडांनी तरुणाच्या वडिलांनाही मारहाण केली. याबाबत तेजस अंकुश राजे (वय 22, रा. कर्वेनगर) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी अक्षय दिल्लीवाला, ओमकार निम्हण (दोघे रा. कर्वेनगर) व त्यांच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. अक्षय दिल्लीवाला याच्यावर पूर्वीही गुन्हे दाखल झाले आहेत. हा प्रकार कर्वेनगर येथील विकास चौकात 17 मार्च रोजी मध्यरात्री सव्वाबारा वाजता घडला.
फिर्यादी हे त्यांच्या कॉलनीतील मित्रांसोबत दरवर्षी तिथीप्रमाणे शिवजयंतीनिमित्त ज्योत आणण्याकरिता सिंहगड येथे जातात. दरवर्षीप्रमाणे हे सर्व मित्र मोटारसायकलवरून निघाले होते. फिर्यादी हे अंकुर धावडे याच्या मोटारसायकलवर मागे बसून फायर कोल उडवत चालले होते.
वाटेत सुवर्ण बाल तरुण मित्रमंडळाजवळ त्यांच्या कॉलनीत राहणारे अक्षय दिल्लीवाला, ओंमकार निम्हण व त्यांचे 2 मित्र थांबले होते. त्यांच्या अंगावर फायर कोल उडाल्यामुळे अक्षय दिल्लीवाला याने माझ्या अंगावर फायर कोल का उडवले, थांब, असे म्हणाला. पाठीमागून अक्षय दिल्लीवाला व त्याचे तिघे साथीदार आले. त्यांनी विकास मित्रमंडळ चौकात त्यांना अडविले.
अक्षयच्या हातात लाकडी बांबू होता. त्याने बांबूने मारण्यास सुरुवात केली. सोबत असलेल्या ओमकार व दोन साथीदारांनी हाताने मारहाण केली. फिर्यादीसोबत असलेल्या मित्रांनी भांडणे सोडविली. अंकुर धावडे यांनी फिर्यादी यांना तेथून निघून जाण्यास सांगितले. पोलिस हवालदार भंडलकर तपास करीत आहेत.
जाब विचारणे भोवले
सिंहगड रोडवर जाऊन ते थांबले असता फिर्यादी यांना वडिलांचा फोन आला. त्यांनी सांगितले की, तुझे विकास चौकात आपल्या कॉलनीतील अक्षय दिल्लीवाला याच्याशी भांडणे झाल्याचे समजल्यावर ते विकास चौकात आले. तेथे अक्षय व ओमकार यांना भांडणे का केली, असा जाब विचारला असता, त्यांनी फिर्यादी यांच्या वडिलांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.