टॉवरच्या तारांची चोरी करताना पडून मृत्‍यू, साथीदारांनी मित्राला पुरले दुर्गम डोंगरात

राजगडच्या पाबे खिंडीतील घटना
Pune Crime News
टॉवरवर चढून तारांची चोरी करताना पडून मृत्‍यू, साथीदारांनी मित्राला पुरले दुर्गम डोंगरात Pudhari Photo
Published on
Updated on

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा

खानापूर रांजणे-पाबे घाट रस्त्यावरील रांजणे (ता. राजगड) येथे दुर्गम डोंगरावरील वीजेच्या टॉवरवर चढून तारांची चोरी करताना खाली पडुन एकजण मृत्युमुखी पडला. या घटनेत मृत्‍युमूखी पडलेल्‍या मित्राला घाटातील पाबे (ता. राजगड) खिंडीतील दुर्गम डोंगरात सोबतच्या दोन साथीदारांनी खड्डा करून त्यात पुरल्‍याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

बसवराज पुरंत मंगनमनी (वय २२, सध्या रा. वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड, मुळ रा. तुळजापूर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. टॉवरवर चढून लोखंडी ब्लेडने तारांची वायर कापताना बसवराज हा १५० फुट खाली कोसळून मृत्युमुखी पडला. नंतर त्याचा मृतदेह त्याचे साथीदार रुपेश अरुण येनपुरे व सौरभ बापु रेणुसे (दोघे रा. पाबे, ता. राजगड) यांनी पाबे डोंगरात पुरून ठेवला असल्याची माहिती गुरुवारी (दि. ८) मध्यरात्री वेल्हे पोलीसांना समजली. त्यानंतर वेल्हे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अप्पासाहेब पडळकर यांच्यासह पोलिस जवान रेस्क्यू पथकाचे तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संदीप सोलस्कर गुलाब भोंडेकर, संजय चोरघे आदींनी मध्यरात्री दुर्गम पाबे डोंगरात धाव घेतली मात्र अंधार व पावसामुळे पहाटे साडेतीनपर्यंत घटनास्थळाचा शोध लागला नाही.

वेल्हे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अप्पासाहेब पडळकर म्हणाले, मृत बसवराज याच्या दोन साथीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांना घटनास्थळी आणण्यात येणार आहे. वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगंळ तसेच महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली शुक्रवारी दुपारी पुरण्यात आलेल्या मृतदेहाचा शोध घेतला जाणार आहे.

बसवराज हा बेपत्ता असल्याची फिर्याद त्याच्या नातेवाईकांनी २३ जुलै रोजी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणी सिंहगड पोलिस तपास करणार असल्याचे वेल्हे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अप्पासाहेब पडळकर यांनी सांगितले.

असा आहे घटनाक्रम

गेल्या महिन्यात १३ जुलै रोजी मयत बसवराज याच्यासह रुपेश येनपुरे व सौरभ रेणुसे हे तिघेजण रांजणे (ता. राजगड) येथे असलेल्या महावितरण कंपनीच्या वीजेच्या टॉवरच्या तांब्याच्या तारांची चोरी करण्यासाठी रात्री गेले होते. बसवराज हा टॉवर चढुन लोखंडी ब्लेडने (एक्साब्लेड) ने तारांची वायर कापत होता. त्यावेळी तो खाली पडुन गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडला. त्यानंतर साथीदार रुपेश व सौरभ याने त्याचा मृतदेह तेथुन पाबे (ता. राजगड) घाटात आणला. घाटातील मंदिरासमोरच्या दुर्गम डोंगरात खड्डा खोदून त्यात बसवराज याचा मृतदेह गाडून दोघे पसार झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news