...अन्यथा, कांदा- बटाटा विभागात काम बंद आंदोलन; मार्केट यार्ड कामगार युनियनचा इशारा

अतिरिक्त वजनामुळे हमाल कामगारांना शारीरिक व्याधी
Pune News
...अन्यथा, कांदा- बटाटा विभागात काम बंद आंदोलन; मार्केट यार्ड कामगार युनियनचा इशारा File Photo
Published on
Updated on

पुणे: गुलटेकडी येथील श्रीछत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कांदा- बटाटा विभागात नायलॉनच्या पिशवीतून अतिरिक्त शेतीमाल पाठविण्यात येत आहे. एका पिशवीत 50 किलोंपेक्षा जास्त कांदा-बटाटा पाठविण्यात येत असल्याने हमाल कामगारांना शारीरिक व्याधी जडल्या आहेत.

पिशवीत 50 किलोंपेक्षा जास्त शेतीमाल पाठविण्यात येत असल्याने त्यावर निर्बंध घालण्याची मागणी श्रीछत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनने केली आहे. या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी न केल्यास 2 मे पासून कांदा- बटाटा विभागात काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत कामगार युनियनचे अध्यक्ष संतोष नांगरे, सचिव विशाल केकाणे यांनी पुणे माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या अध्यक्षांना निवेदन दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कांदा- बटाटा विभागात पाठविण्यात येणार्‍या नायलॉन पिशवीत 50 किलोंपेक्षा जास्त शेतीमाल पाठविण्यात येत आहे. साधारणपणे एका पिशीत 70 ते 75 किलो कांदा- बटाटा भरण्यात येत आहे.

पिशवीची वाहतूक करताना, तसेच वजन काट्यावर मोजमाप करताना कामगारांची बोटे कापली जातात. तसेच, पिशवीला लावलेला हूक निसटून दुखापत होण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. नायलॉन पिशवीला हूक लावल्यानंतर ती फाटते. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होते. अतिरिक्त वजनामुळे गाळा आणि टोळीतील कामगारांचे मणके आणि गुडघ्यांना दुखापत होत आहे.

त्यामुळे कामगारांकडून राजीनामा देण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत, असे संतोष नांगरे, विशाल केकाणे यांनी निवेदनात म्हटले आहे. बाजारात पाठविण्यात येणार्‍या पिशवीत 50 किलोंपेक्षा जास्त माल असू नये, असे आदेश छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने कामगारांना शारीरिक व्याधी जडल्या आहेत. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा, 2 मे पासून मार्केट यार्डातील कांदा- बटाटा विभागात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news