पुण्यातील येवलेवाडी भागात काचेच्या गोदामात कंटेनरमधून काचांचे मोठमोठाले पॅलेट उतरविताना घडलेल्या भीषण दुर्घटनेत चार मजुरांचा मृत्यू झाला, तर दोन कामगार किरकोळ जखमी झाले. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच क्रेनच्या साहाय्याने लाकडी पॅलेट बाहेर काढले. त्यानंतर जखमींना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले.
अमित शिवशंकर कुमार (वय 40, सध्या रा. धांडेकरनगर, हॉलीव हॉस्टेल, पहिला माळा, येवलेवाडी, कोंढवा बुद्रुक, कायमचा पत्ता- रायबरेली, उत्तर प्रदेश), विकास सर्जू प्रसाद गौतम (वय 23, सध्या रा. धांडेकरनगर, मूळ रा. उत्तर प्रदेश), धर्मेंद्र सत्यपाल कुमार (वय 40) आणि पवन रामचंद्र कुमार (वय 44, रा. धांडेकरनगर, मूळ रा. सलोन, रायबरेली, उत्तर प्रदेश) अशी मृत्यू झालेल्याची नावे आहेत. हे सर्व मजूर होते. जगतपाल संतराम सरोज (वय 49, रा. धांडेकरनगर) व मोनेश्वर (पूर्ण नाव माहीत नाही) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवलेवाडी रस्त्यावर सीएनजी पेट्रोलपंपमागे ’इंडिया ग्लास सोल्युशन’ नावाने काचेचे मोठे गोदाम आहे. या ठिकाणी मोठमोठ्या काचा आणल्या जातात. त्या ठिकाणी काचेवर प्रक्रिया केली जाते आणि त्यानंतर मागणीनुसार विक्रीसाठी त्या शहरात विविध भागांत पाठविले जाते.
रविवारी दुपारी नेहमीप्रमाणे लाकडाच्या पॅलेटमध्ये दहा ते बारा फुटांच्या तब्बल दोन ते तीन टन वजनाचा काचांनी भरलेला कंटेनर गोदामावर आला होता. या वेळी तेथील दहा मजूर काचेचे पॅलेट उतरवत असताना पॅलेटला बांधलेला बेल्ट तुटला. काचेचे बंडल या मजुरांच्या अंगावर पडले. या दोन टन वजनाच्या काचेच्या बंडलखाली काही कामगार अडकले गेले. काचेने भरलेल्या पॅलेटचे वजन अधिक असल्याने ते सहजासहजी बाजूला काढता येण्यासारखे नव्हते. त्यामुळे तत्काळ अग्निशमन दलाला याबाबतची माहिती देण्यात आली. त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. हाताने हे पॅलेट बाजूला सरकण्यासारखे नसल्याने तत्काळ क्रेन मागविण्यात आली. क्रेनच्या साह्याने काही मिनिटांत हे पॅलेट बाजूला करण्यात आले. या वेळी पॅलेटमधील काचाही फुटल्या होत्या. मात्र, या वजनदार पॅलेटच्या खाली अडकलेले कामगार गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले होते. त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता, तर उपचारांदरम्यान दोघांचा मृत्यू झाला. या वेळी दोन जखमींवरही उपचार करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी, तसेच स्थनिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, हे गोदाम कोणाच्या मालकीचे आहे, यामध्ये सुरक्षेची साधने पुरवली गेली होती का, याची माहिती घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.
येवलेवाडी येथील काचेच्या गोदामात काचांनी भरलेले पॅलेट उतरविताना दुर्घटना घडल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. या वेळी घटनास्थळी पोहचल्यानंतर कामगारांच्या अंगावर काचा असलेले लाकडी बंडल कोसळल्याचे आढळले. पेट्यांमध्ये दहा ते बारा फूट लांबीच्या काचा होत्या. या वेळी तत्काळ क्रेन बोलावून क्रेनच्या साह्याने हे बंडल बाजूला करून जखमींना रुग्णालयात हलविले.
समीर शेख, अग्निशमन अधिकारी, अग्निशमन दल
या घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला असून, इतर कामगारांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. घटना कशी घडली व यात कोण दोषी आहे का, याचा तपास सुरू आहे.
विनय पाटणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा