जेजुरी: महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरीनगरीत पौष पौर्णिमेनिमित्त भरलेल्या गाढवांच्या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली. या बाजारात गाढवांना 25 हजारांपासून एक लाखापर्यंत भाव मिळाला.
जेजुरी येथील गाढवांच्या बाजारात गुजरात व महाराष्ट्राच्या विविध भागांतून पाचशेहून अधिक गाढवं विक्रीसाठी दाखल झाली आहेत. गुजरातमधून आणल्या काठेवाडी गाढवांना 50 हजार रुपयांपासून एक लाख रुपयापर्यंत भाव मिळत आहे. गावठी गाढवांना 25 हजारांपासून ते 50 हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.
या बाजारात यंदा गाढवांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे गाढवांना चांगला भाव मिळत आहे. गाढवाचे दात, वय पाहून त्याची किंमत ठरविली जाते. दोन दातांच्या गाढवांना दुवान, चार दातांच्या गाढवांना चौवान, कोरा, अखंड, जवान असे म्हटले जाते. अखंड दात असलेल्या गाढवाला चांगली किंमत मिळत आहे.
पौष पौर्णिमेला जेजुरी येथील यात्रेसाठी राज्यभरातून भाविक येत आहेत. तसेच, गाढवावर उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या कोल्हाटी, वैदू, बेलदार, कुंभार, गाडीवडार, मातीवडार, कैकाडी, मदारी, गारुडी, घिसाडी, माकडवाले या भटक्या जमातींतील हजारो भाविक या यात्रेत सहभागी झाले आहेत. कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शनाबरोबरच गाढवांची खरेदी-विक्री करून भाविक या पारंपरिक यात्रेचा आनंद घेत आहेत.