Pune Accident News: बाणेरमधील ननवरे ब्रिज परिसरात वाहनाला धडक बसल्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत चार ते पाच वाहनांना धडक देत वरदायिनी सोसायटीपर्यंत ग्लॉस्टर चालकाने थरार केला. या प्रकाराने कल्याणीनगर अपघात प्रकरणाची आठवण करून दिली.
बाणेर राहुल अर्कस सोसायटीत केअरटेकर म्हणून असणारे ऋत्विक बनसोडे याला दूध आणण्यासाठी पाठवले असता त्यांनी ननावरे ब्रिज जजवळ एका वाहनाला धडक दिली. तेथून पळ काढत असताना पुढे असणार्या वाहनांना धडक देत ननवरे ब्रिज खाली स्कूलबसला धडक दिली. तेथे त्याची ग्लॉस्टर थांबली. परंतु, नागरिकांचा जमाव त्याला गाडीतून खाली उतर म्हणत असताना त्याने खाली न उतरता गाडी पुढे-मागे करून रस्ता काढत पुन्हा सूसच्या दिशेने निघाला.
पुढे सूस बाजूने निघाल्यावर एक- दोन वाहनांना धडक दिली व वरदायिनी सोसायटीजवळ एका क्रियेटाला धडकून ग्लॉस्टर अखेर पलटी झाली. ग्लॉस्टरचा थैमान संपला व थांबलेली गाडी पाहून पाहणार्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
पोलिसांनी ऋत्विक बनसोडे याला ताब्यात घेतले असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवल्याचे सांगितले आहे. त्याने चार ते पाच वाहनांना धडक दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पाषाणमध्ये गुरुवारी (दि.5) सायंकाळी साडेपाच वाजता अपघात झाला असून नमूद ग्लॉस्टर गाडीचालक याला ताब्यात घेतले असून वैद्यकीय तपासणीकरिता पाठवले आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. पोलीस ठाण्यात फिर्याद घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
