Amol Kolhe
औरंगजेब कबरीच्या ठिकाणी मराठ्यांचे शौर्यस्मारक उभारावे; अमोल कोल्हे यांची मागणी File Photo

औरंगजेब कबरीच्या ठिकाणी मराठ्यांचे शौर्यस्मारक उभारावे; अमोल कोल्हे यांची मागणी

'क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर म्हणजे मराठ्यांच्या असीम शौर्याचे प्रतीक आहे'
Published on

नारायणगाव: क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर म्हणजे मराठ्यांच्या असीम शौर्याचे प्रतीक आहे. केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी ‘मराठ्यांच्या शौर्याचे स्मारक’ उभारावे, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. त्याचबरोबर कुणाचीही राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची होळी होऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी तरुणाईला केले.

गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील वातावरण तापले आहे. त्यात अनेक राजकीय नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे वातावरण कलुषित होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होऊ नये, या भूमिकेशी सहमती दर्शविताना खा. डॉ. कोल्हे यांनी, जो कुणी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघेल, त्याची अवस्था ‘हीच’ होईल, हे दाखवून देणारी ही कबर आहे, असे सांगितले.

छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, स्वराज्य सौदामिनी ताराराणी साहेबा आणि संताजी घोरपडे, धनाजी जाधव व अठरापगड जातींच्या मावळ्यांनी तब्बल 27 वर्षे औरंगजेबाला दख्खनमध्ये टाचा घासायला लावल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य धुळीस मिळविण्यासाठी आलेल्या औरंजेबाला इथेच मूठमाती दिली. त्याचे प्रतीक ही कबर आहे; म्हणूनच ‘मराठ्यांच्या शौर्याचे स्मारक’ या ठिकाणी उभारण्याची मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे.

यासंदर्भात जारी केलेल्या व्हिडीओमध्ये खासदार डॉ. कोल्हे यांनी ‘कुणाची राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची होळी होऊ देऊ नका’ असे आवाहन तरुणाईला केले आहे. खा. डॉ. पुढे म्हणाले, सत्ता येते-जाते, राज्यकर्ते येतात-जातात, बदलतात; पण एकदा का केसेस तुमच्या पाठीमागे लागल्या, तर या केसेसपायी तुमच्या करिअरची राखरांगोळी होऊ शकते. तुमच्या पालकांनी ज्या खस्ता खाऊन तुमचे शिक्षण केले, तुमच्या करिअरची स्वप्ने पाहिली, त्या करिअरच्या स्वप्नांना, आई-वडिलांच्या स्वप्नांना कुणाची तरी राजकीय पोळी भाजण्यासाठी नख लागू देऊ नका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news