भीमेची जलपर्णी नागरिकांसाठी ठरतेय शाप; जलपर्णी काढण्याची मागणी
नानगाव: दौंड आणि शिरूर तालुक्यांना वरदान ठरलेल्या भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी साठली आहे. या जलपर्णीमुळे नदीकाठचे शेतकरी, नागरिक तसेच मासेमारी व्यवसाय करणारे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे भीमेची जलपर्णी नागरिकांसाठी शाप ठरत असल्याचे बोलले जात आहे.
नदीपात्रातील बंधारे झाले. शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला. मात्र, त्यानंतर जलपर्णीचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला. दरवर्षी बंधार्याचे ढापे टाकले की जलपर्णी मोठ्या प्रमाणावर वाढू लागते आणि नदीपात्र व्यापून टाकते.
या जलपर्णीचा नदीपात्रालगतच्या शेतकर्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. विद्युत मोटारींचे पाइप व पाणी ओढण्याच्या फुटबॉलला जलपर्णीचा विळखा पडतो. शेतकर्यांना सतत पाण्यात उतरून पासपमधील घाण काढावी लागते. शेतीपिकांना पाण्याची गरज असताना त्यांना असा त्रास सहन करावा लागतो.
उन्हाळ्यात जलपर्णी सडल्याने दुर्गंधीचा त्रास
उन्हाचे प्रमाण वाढताच व नदीपात्रातील जलपर्णी सडू लागल्याने नदीकाठच्या गावांना डासांचा मोठा प्रादुर्भाव जाणवतो. पाण्याला येणारी दुर्गंधी आणि डासांचे वाढते प्रमाण यामुळे नदीकाठचे नागरिक हैराण होतात. तर या काळात डासांमुळे होणार्या आजारांचे प्रमाणदेखील वाढते.
मासेमारीवर होतो परिणाम
बंधार्याचे ढापे टाकल्यावर मोठ्या प्रमाणावर जलपर्णी नदीपात्रात साठते याचा मोठा फटका नदीकाठच्या मासेमारी करणार्या कुटुंबांना बसतो. त्यामुळे हा व्यवसाय पावसाळा येईपर्यंत बंद असतो. जवळपास चार-पाच महिने हा व्यवसाय जलपर्णीमुळे बंद किंवा कुठेतरी थोड्याफार प्रमाणात सुरू असतो. यामुळे या कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडते. या काळात अशा कुटुंबांना अनेक संकटांना तोंड देत पावसाळ्याची वाट पाहावी लागते.
जलपर्णीच्या समस्येवर कायमचा तोडगा काढा
या जलपर्णीच्या समस्येवर कायमचा तोडगा काढावा. पुढील काही दिवसांत जलपर्णी सडण्यास सुरुवात होईल. या अगोदरच नदीकाठच्या ग्रामपंचायतींनी डास प्रतिबंधक फवारणीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून ठेवावे. तसेच गरजेनुसार गावात डास प्रतिबंधक फवारण्या कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.
