Mahashivratri 2025: बारामतीत ग्रामदैवत श्रीसिद्धेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भव्य महोत्सवाचे आयोजन

या मंदिराला 786 वर्षे पूर्ण झाली आहेत
Mahashivratri 2025
बारामतीत ग्रामदैवत सिद्धेश्वराचा भव्य महोत्सवPudhari
Published on
Updated on

जळोची: बारामतीचे ग्रामदैवत श्रीसिद्धेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्‍हा नदीच्या उगमस्थानापासून संगमापर्यंत 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यापैकी एक असे बारामतीचे ग्रामदैवत सिद्धेश्वर देवस्थान प्रसिद्ध आहे. या मंदिराला 786 वर्षे पूर्ण झाली आहेत. यादवकाळातील हेमाडपंती बांधणीचे अतिशय सुंदर, घडीव आणि अप्रतिम शिल्पकामाने सजविलेले हे मंदिर आहे. मंदिरामधील नंदी अतिशय देखणा, दगडी कोरीव काम असा आकर्षक आहे.

इतिहासातील उल्लेखांनुसार सिद्धेश्वर मंदिराचे बांधकाम इसवी सन 1147 मध्ये राजा रामदेवराय यादव यांनी सुरू केले. सन 1237 मध्ये ते पूर्ण झाले. सुमारे नव्वदवर्षे हे बांधकाम सुरू होते. अखंड लिंग व अखंड दगडात कोरलेला सुंदर नंदी या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. या मंदिराच्या कळसाखाली ध्यानधारणा करण्यासाठी जागा आहे. तिथे एक महादेवाची पिंड होती. मंदिराच्या दुसर्‍या सभामंडपात कासवाखाली नक्षिकाम करण्यात आले आहे.

उत्तम स्थापत्यशैली आणि शिल्पकाम असलेल्या या मंदिराला संत ज्ञानेश्वर माउली, जगद्गुरू संत श्रीतुकाराम महाराज, महाराज श्रीशहाजीराजे, छत्रपती श्रीशिवाजी महाराज, छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांच्यापासून कविवर्य मोरोपंत यांच्यापर्यंत अनेक थोरामोठ्यांनी त्याकाळी भेट दिली असून, हे मंदिर बारामतीच्या वैभवशाली वारसापरंपरेचे साक्षीदार आहे.

शिवकालानंतर पहिले बाजीराव पेशवे यांनी पांडुरंग दाते यांच्याकडे या मंदिराची व्यवस्था सोपवली. तेव्हापासून आजपर्यंत दाते कुटुंब सिद्धेश्वराची दैनंदिन व्यवस्था पाहतात. दाते यांची सध्या बारावी पिढी देवाची सेवा करते. मंदिराच्या इतिहासाबद्दल पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी इसवी सन 1723 मध्ये मोडी भाषेत एक सनद लिहून ठेवली होती, जी आजही दाते यांच्याकडे आहे. संत ज्ञानेश्वर माउलींनी येथे गणपतीची मूर्ती स्थापन केली.

कविवर्य मोरोपंत व श्रीधर स्वामी यांनी मंदिराच्या आवारात बसून लेखन केले आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम याच मंदिरात पूर्वी होता. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मोठा महोत्सव आयोजित केला जातो व विविध कीर्तनकार यांना या ठिकाणी आमंत्रित केले जाते. दर्शनासाठी विविध भागांतून भाविक येत असतात.

नंदीच्या अंगावर दगडाने कोरलेली झूल

अखंड दगडात कोरलेले सालंकृत रूप, आरामदायी बैठक, त्यामध्येच चपळ असा नंदी, हे श्रीसिद्धेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य. नंदीच्या अंगावर दगडात कोरलेली झूल आणि घुंगरे आहेत. समोरून नंदीकडे पहिले, तर त्याचा एक कान पाहणार्‍याकडे आणि दुसरा महादेवाकडे आहे. नंदीचा ओटा हा 12 फूट लांब व 12 फूट रुंद व ओट्याचा जोता हा अडीच फूट उंच आणि तीन कप्प्यांत आहे. नंदीचे मुख्य जोते 4 फूट लांब व 3 फूट रुंद आहे.

नंदीची उंची 6 फूट, तर 11 इंच उंचीचे वशिंड, सव्वा फूट उंचीची शिंगे आणि 11 इंचाचे कान आहेत. नंदीच्या गळ्यात 5 इंचाची घंटी, 50 घुंगरांचा बाजूबंद पट्टा आहे. नंदीची मेघडंबरी 13 लहान दगडी कमानींची असून, चारही बाजूला हनुमान व नक्षिकाम केलेले खांब आहेत.

श्रीसिद्धेश्वर मंदिराला ऐतिहासिक परंपरा आहे. याचे जतन करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत. यात वारसाप्रेमींची साथ मिळाल्याने हा पुरातन ठेवा आजही सुस्थितीत आहे. कार्तिक स्वामी, दत्त महाराज, श्रीहनुमान, श्रीविठ्ठल-रुक्मिणी, काळभैरवनाथ, महाकाली, नरसिंह, परशुराम, संतोषीमाता, गोंदवलेकर महाराज, संत श्रीतुकाराम, संत श्रीज्ञानेश्वर आदींची छोटी मंदिरे भाविकांच्या इच्छेखातर परिसरात बनवली आहेत.

- समीर दाते, मुख्य विश्वस्त, श्रीसिद्धेश्वर मंदिर, बारामती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news