धायरी: नर्हे येथील नवले पूल चौकात रविवारी दुपारी दोनच्या सुमारास चार वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
कात्रज बाह्यवळण मार्गावरून ही वाहने मुंबईच्या दिशेने जात होती. दरम्यान, आयशर टेम्पो नवले पूल चौकातील सिग्नलला थांबला होता. त्या वेळी पाठीमागून आलेल्या दोन कार या आयशर टेम्पोला धडकल्या. तसेच, या कारला पाठीमागून आलेल्या दुसर्या एका टेम्पोची धडक बसली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातामुळे चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच सिंहगड वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अशोक कदम व दत्तात्रय पठाडे हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.