

पुणे : राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर आयएएस आणि आयपीएस अधिकार्यांच्या बदल्यांचा धमाका सुरू झाला आहे. आता यापाठोपाठ महसूलमधील अधिकार्यांच्या देखील बदल्यांचा धमाका सुरू होणार असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आल्यानंतर अधिकार्यांच्या बदल्यांचा धमाका सुरू झालेला पाहायला मिळत आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमुळे स्वत:च्या जिल्ह्यातील अधिकार्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या झालेल्या होत्या. यामध्ये उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, कृषी अधिकारी यांचा समावेश होता. अनेक अधिकार्यांना निवडणुकीमुळे बाहेरच्या जिल्ह्याचा रस्ता धरावा लागला होता. अनेकांना तर विभाग बदलून दुसर्या विभागात पोस्टिंग मिळाल्याने तिकडे जावे लागले.
मार्च महिन्यानंतर अधिकार्यांच्या बदल्या होणार आहेत. याकरिता अधिकार्यांनी आत्तापासूनच फिल्डिंग लावली. काहींनी मुंबईच्या वार्या सुरू करत आमदार, खासदार आणि मंत्री यांचे शिफारसपत्र आपल्या पदरात पाडून घेण्यास सुरुवात केली आहे. काही झाले तरी आपल्याच ही पोस्टिंग मिळाली पाहिजे, असा चंग अनेक अधिकार्यांनी बांधला आहे. जिल्हा प्रशासनातील देखील अनेक महत्त्वाच्या पदांवरील अधिकार्यांच्या बदल्या होणार असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवार यांनी पालकमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नवीन अधिकारी आणण्यास सुरुवात केली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना देखील सातारवरून पुण्यात आणले. पवार यांची प्रशासनावर पकड असल्याने त्यांना सक्षम अधिकारी लागतात. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यातील विविध शासकीय पदांवर नेमकी कोणाकोणाची वर्णी लागणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्यधिकारीपदी देखील गजानन पाटील यांची वर्णी लागली आहे. त्यांना देखील अजित पवार यांच्या कार्यालयामध्ये काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. जिल्हा परिषदेमधील देखील उपमुख्याधिकार्यांच्या बदल्या होणार आहेत.
आपल्याला चांगली पोस्टिंग मिळावी, याकरिता अनेक अधिकार्यांनी मुंबईची वाट धरली आहे. जास्तीत जास्त आमदार, खासदार आणि मंत्रिमहोदयांची पत्रे आपल्याच पारड्यात पडतील, याचा विचार करून अधिकारी कामाला लागले आहेत. याचबरोबर कुठेकुठे जागा रिकाम्या होणार आहेत, त्या ठिकाणी आत्तापासूनच अधिकार्यांचा सर्च सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.