भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण मृत्युमुखी पडल्याची घटना नगर रस्त्यावरील खराडी भागात मंगळवारी (दि. 24) सकाळी घडली. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला असून त्याच्याविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
चैतन्य उमेश शिंदे (वय 23, रा. सुप्रिया आंगण सोसायटी, वाघोली) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. चैतन्यने संगणकशास्त्र अभ्यासक्रम नुकताच पूर्ण केला होता. तो खराडीतील एका माहिती- तंत्रज्ञान कंपनीत नोकरीला लागला होता. दुचाकीस्वार चैतन्य मंगळवारी सकाळी साडेसहाला नगर रस्त्याने निघाला होता. रिलायन्स मार्टजवळ भरधाव डंपरने दुचाकीस्वार चैतन्यला धडक दिली. दुचाकीस्वार चैतन्य फेकला गेल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता डंपरचालक पसार झाला. अपघातानंतर रहिवासी आणि पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघातात चैतन्यच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
अपघातानंतर पसार झालेल्या डंपरचालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. डंपरचालक हडपसरकडे पसार झाल्याचे दिसून आले.
नगर रस्त्यावरील खराडी, वडगाव शेरी, वाघोली परिसरात गंभीर स्वरुपाच्या अपघाताच्या घटना सातत्याने घडतात. नगर रस्त्याचा वापर जडवाहने करतात. वाघोली भागात नागरिकीकरण वाढले आहे. जडवाहनांमुळे गंभीर, तसेच प्राणांतिक अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. भरधाव वेगामुळे गंभीर स्वरुपाच्या अपघाताच्या घटना घडतात.