

सोमेश्वरनगर: हडपसर-भेकराईनगर येथील चार मित्र फलटण येथे लग्नकार्यासाठी आले होते. परत जाताना निंबुतनजीक निंबुत छपरी येथे निरा डाव्या कालव्यात ते पोहण्यासाठी उतरले. यातील एकाचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. या युवकाचे नाव तुषार खेडकर (वय 21, रा. शिवशक्ती चौक भेकराईनगर हडपसर, पुणे) असे आहे. याबाबत निखिल कुन्हाडे (रा. काळेपडळ भेकराईनगर, हडपसर पुणे) यांनी वडगाव निंबाळकर पोलिसात माहिती दिली.
याबाबत माहिती अशी की, रविवारी (दि. 20) भेकराईनगर-हडपसर येथील तुषार खेडकर, गौरव भोसले, मंगेश शेळके व सुरज चौगुले हे दोन मोटारसायकलवरून फलटण येथे लग्न असल्याने फलटण गेले होते. लग्न झाल्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता फलटण येथून निघून पुणे येथे येत होते.
दरम्यान सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास निंबुत गावचे हद्दीत निंबुत छपरी मेथील निरा डावा कालव्यामध्ये पोहण्यासाठी सर्व मित्र उतरले. पोहत असताना तुषार खेडकर याचा पाय घसरल्याने तो पाण्यात वाहत जाऊन बुडाला. स्थानिकांच्या मदतीने पाण्याबाहेर काढून त्याला साई सेवा हॉस्पिटल वाघळवाडी येथे आणण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.