इथे माणसं राहतात की जनावरं?, पुण्यातील अण्णाभाऊ साठे नगरातील इमारतीची अवस्था | पुढारी

इथे माणसं राहतात की जनावरं?, पुण्यातील अण्णाभाऊ साठे नगरातील इमारतीची अवस्था

पुणे, प्रसाद जगताप : सांडपाण्याचे पाईप लिकेज, इमारतीच्या पार्कींगमध्ये साठलेले पाणी, तुटक्या-फुटक्या फरशा, परिसर आणि पार्कींगमध्येच साठलेला कचरा, भिंतींना तडे, स्लॅब पाझरलेले, भिंतींना ओल आलेली, अशी दनीय अवस्था गंजपेठेतील लोकशाहीर  अण्णाभाऊ साठे नगर पीएमसी कॉलनी नं. ६ इमारतीची झाली आहे.

स्वच्छचा नारा मिरवणार्‍या महापालिका प्रशासनाच्या गंजपेठेतील अण्णाभाऊ साठे नगरातील इमारतीची अवस्था बिकट झाली आहे. १२ मजली असलेल्या या इमारतीचे ड्रेनेज पाईप पार्किंगमध्ये ठिकठिकाणी लिकेज होत असून, सांडपाण्याच्या या इमारतीला धाराच लागलेल्या आहे. या इमारतीच्या झालेल्या दुरावस्थेमुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तर ही परिस्थिती निर्माण होण्यास पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप रहिवासी करत आहेत.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर ६ नं. कॉलनी महात्मा फुले पेठ याठिकाणी बी.ओ.टी. पध्दतीने बांधण्यात आलेल्या सदनिकेचे प्रकाश जावडेकर मंत्री यांच्या उपस्थितीत उद्घाटन दिनांक ८ एप्रिल २०१६ रोजी झाले. मात्र, अवघ्या ६ ते ७ वर्षात या इमारतीची अवस्था खूपच दयनीय झाली आहे. यावरून या इमारतीचे बांधकाम किती निकृष्ट दर्जाचे आहे ते दिसून येत आहे.

सांडपाण्याच्या धारा

या इमारतीच्या पार्कींमध्ये येणारा सांडपाण्याची पाईप प्रत्येक ठिकाणी कोठे ना कोठे तरी लिकेज झालेली आहे. त्यातून सांडपाण्याच्या पाऊस कोसळल्याप्रमाणे धारा कोसळत आहेत. त्यामुळे संपुर्ण पार्कींग परिसरात मलमुत्राचे दुर्गंधी पसरलेली आहे. हेच सांडपाणी येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत जात असून, त्यामुळे येथील अनेक नागरिकांना हे अस्वच्छ पाणीच प्यावे लागत आहे. परिणामी, आधीच कोरोनाचा कहर असताना यामुळे मोठी आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पालिका प्रशासन आमच्याकडून याठिकाणी राहण्यासाठी १० हजार रूपये भाडे घेत आहे. मात्र, सुविधा काहीच नाहीत. स्वच्छता करायला कोणीही येत नाही. त्यामुळे प्रचंड कचरा साचला आहे. इमारतीला असलेले सांडपाण्याचे पाईप लिकेज झाले आहेत. त्यामुळे संपुर्ण पार्कींगमध्ये सांडपाणी जमा झाले आहे. अनेकदा याबाबत तक्रारी केल्या. परंतु, याकडे कोणीही लक्ष देत नाही.
– अजय पवार, रहिवासी

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही याठिकाणी राहतो. मात्र, आम्हाला कोणतीही सुविधा देण्यात येत नाही. फक्त आमच्याकडून अव्वाच्या सव्वा भाडे घेतले जाते. इमारत अक्षरश: पडायला आली आहे. भिंतींना तडे गेले असून, इमारत अनेक ठिकाणी लिकेज होत आहे. स्लॅब गळतीसोबतच सांडपाण्याचे पाईप सुध्दा लिकेज होत आहेत. भिंतींना ओल आली आहे. त्यामुळे आम्ही इथे कसे राहायचे? असा प्रश्न पडत आहे. पण काय करणार परिस्थिती समोर गप्प बसावे लागते.
– गणेश जाधव, रहिवासी

लिफ्ट बंद, इमारतीमध्ये लाईट नाहीत. सांडपाण्याची असलेली गळती. कचर्‍याचे ढिगारे, सर्वत्र अस्वच्छता पाहून आम्हाला येथे राहावेसे वाटत नाही. याबाबत अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, कायमच याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. स्थानिक प्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी याकडे कायमच डोळेझाक करतात.
– सुजाता शेलार, रहिवासी

Back to top button