पुणे – नाशिक महामार्गावरील वाहतुकीत बदल, वाहनधारकांना फटका | पुढारी

पुणे - नाशिक महामार्गावरील वाहतुकीत बदल, वाहनधारकांना फटका

आळेफाटा, पुढारी वृत्तसेवा

पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना शनिवारी (दि. २५) चांगलाच फटका बसला. वाहतुकीत केलेल्या बदलामुळे कल्याण-नगर महामार्गावर शेकडो अवजड वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या. त्यामुळे वाहनचालक संतप्त झाले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाताळच्या सुट्टीमुळे श्री क्षेत्र भीमाशंकर व चास धरण (ता. खेड) येथे पर्यटक भाविक मोठ्याप्रमाणात येत असतात. या परिस्थितीत महामार्गावर अवजड वाहतूक  राहिल्यास वाहतुकीची कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. याचा त्रास नागरीकांसह भाविकांना होवू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांच्या आदेशाने सकाळी आठ वाजल्यापासून आळेफाटा चौकातून पुण्याकडे जाणारी सर्व अवजड वाहने आळेफाटा, बेल्हे, शिरूर, शिक्रापूर, चाकण मार्गे पुणे अशी दुपारी तीन वाजेपर्यंत वळवण्यात आली.

अचानक वाहतूक वळविण्यात आल्याने परराज्यातील वाहनचालकांनी कल्याण-नगर महामार्गाच्या कडेला आपली वाहने उभी केली. त्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या. कुठलीही कल्पना न देता वाहतूक वळविल्याने वाहनचालक चांगलेच संतप्त झाले होते. दरम्यान, दुपारी तीन नंतर पोलिसांनी पुण्याकडे जाण्यास अवजड वाहनांना परवानगी दिली. त्यानंतर कल्याण-नगर रोडवरील वाहने पुण्याच्या दिशेने गेली. त्यामुळे सायंकाळी पुणे – नाशिक महामार्गावर जड वाहनांच्या रंगा लागल्या होत्या.

हेही वाचा

Back to top button