देहूरोड : पुढारी वृत्तसेवा : तीर्थक्षेत्र देहू येथील नगर पंचायतीसाठीची पहिलीच निवडणूक मंगळवार (दि.21) अखेर पार पडली. गेले सात वर्ष निवडणूक या ना त्या कारणामुळे रखडली होती.
मध्यंतरीच्या काळात राजकीय घडामोडी घडून ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर झाले. या पहिल्यावहिल्या निवडणुकीचा निकालाची 19 जानेवारी 2022 तारखेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
देहूत अतिशय चुरशीची निवडणूक झाली; परंतु उमेदवारांना प्रचारासाठी अवघा चार दिवसांचा वेळ मिळाला. जबरदस्त टक्कर असलेल्या राष्ट्रवादी काँगे्रस आणि भारतीय जनता पक्षाची एकाही वरिष्ठ नेत्याची सभा झाली नाही; मात्र या निवडणुकीवर आमदार सुनील शेळके बारीक लक्ष ठेवून होते.
भाजपने देहूरोड वरून कार्यकर्ते बोलावून घेतले होते. माजी मंत्री संजय भेगडे हे देखील या निवडणुकीवर लक्ष ठेवून होते. त्यामुळे या दोन पक्षात जोरात टक्कर होती.
मंगळवारी नगर पंचायतीसाठी मतदान झाले आणि 48 उमेदवारांचे भविष्य इव्हीएम यंत्रांमध्ये बंद झाले. या निवडणुकीसाठी 1999 सालातील जनगणनेचा आधार घेतला आहे. त्यानुसार देहूची लोकसंख्या 18 हजार धरण्यात आली आहे.
यापैकी 10 हजार 817 मतदारांनी (74.97%) मतदानाचा अधिकार बजावला आहे. देहूत मागील सात वर्षात राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यामुळे यावेळेस कुणाची बाजी लागेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे; परंतु या निकालाची प्रतीक्षा 19 जानेवारीपर्यंत करावी लागणार आहे.
ओबीसी आरक्षित वॉर्डची निवडणूक यापूर्वीच रद्द झाली आहे. माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार आता या जागांवर सोडत होणार आहे. देहू येथे 18 तारखेला ही सोडत होणार आहे. त्यामध्ये खुल्या प्रवर्गातून लोक घेण्यात येतील.
वॉर्ड क्रमांक 11,12, 14 आणि 15 ची निवडणूक थांबविण्यात आली होती. यावर्षी 18 तारखेला सोडत होणार असून एकोणीस तारखेला निकाल येईल. त्यामुळे मंगळवारी पार पडलेल्या नगर पंचायतीसाठीच्या मतदानाचा निकाल आहे 19 तारखेपर्यंत थांबवला आहे. त्यामुळे मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचणार आहे.