

पुणे : रोखठोक पत्रकारितेद्वारे विविध प्रश्नांवर निश्चित अशी भूमिका घेत व्यवस्था बदलायला भाग पाडणार्या दै. ‘पुढारी’ने मोठ्या दिमाखात 87 व्या वर्षात पदार्पण केले असून त्या निमित्ताने उद्या, शुक्रवारी (दि. 3) स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांतील नामवंतांपासून ते पुढारीवर प्रेम करणार्या वाचकांपर्यंतच्या विविध घटकांची गप्पांची ही मैफल सारसबागेजवळील मित्र मंडळ चौकातील मॅरेथॉन हॉल गार्डनच्या मैदानावर संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत रंगणार आहे.
वृत्तपत्राच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आवाजाला व्यासपीठ देणार्या ‘पुढारी’ने त्यानंतर ऑनलाइन पुढारी, टोमॅटो एफएम, आऊटडोअर मीडिया अशी एकामागून एक आधुनिक माध्यमे हाताळत गेल्या वर्षी ‘पुढारी न्यूज’ च्या माध्यमातून खासगी वाहिनीच्या क्षेत्रातही प्रवेश केला.
हा केवळ प्रवेश नव्हता, तर त्या वाहिनीने अल्पावधीत राज्यातील तसेच राज्याबाहेरीलही लक्षावधी जनतेची मने जिंकली आणि लोकप्रियतेचा नवा मानदंड गाठला. अशा ’पुढारी’ माध्यमसमूहाकडून या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दै. ’पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री प्रतापसिंह जाधव आणि समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांची भेट आणि त्यांच्याशी हितगुज करण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे.
दै. ’पुढारी’च्या वर्धापनदिनी दरवर्षी होणारा स्नेहमेळावा म्हणजे राजकारणापासून ते सांस्कृतिक क्षेत्रापर्यंतच्या आणि उद्योग-व्यापारापासून ते सामाजिक क्षेत्रापर्यंतच्या विविध क्षेत्रांमधील लहानथोरांशी हितगुज करण्याची, त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्याची पर्वणीच ठरते. त्यामुळेच दै.’पुढारी’ने 87 व्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने आयोजिलेल्या या स्नेहमेळाव्यास उपस्थित राहावे,अशी आग्रहाची विनंती पुणे शहर तसेच जिल्ह्यातील सर्वांनाच करण्यात आली आहे.
ए. आय. विषयी सर्वकाही...
’पुढारी’चा वर्धापन दिन आणि नव्याकोर्या विषयाला वाहिलेल्या पुरवण्या हे जणू समीकरणच झाले आहे. यंदाही वर्धापनदिनानिमित्त ’ए. आय. महाक्रांती’ या ए.आय. विषयी सर्वकाही अशा विशेष पुरवण्या ’पुढारी’ एक जानेवारीपासून प्रसिद्ध करीत आहे. कृत्रिम बुध्दिमत्ता अर्थात ए.आय. विषयातील तज्ज्ञांच्या अतिशय अभ्यासपूर्ण लेखणीतून साकारलेल्या या संग्राह्य पुरवण्या वाचकांना नक्कीच आवडतील, अशाच असणार आहेत.
वाचकांसाठी खास सेल्फी पॉईंट
पुढारीच्या स्नेहमेळाव्याला आपण उपस्थित राहिल्याची आठवण आपल्याजवळ राहावी, यासाठी या मेळाव्याच्या मैदानावर खास सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे. तोही या मेळाव्याचे आकर्षण ठरणार आहे.